Diwali 2021 :- भारतात साजरा केल्या जाणाऱ्या सणांमध्ये सर्वात प्रसिद्ध आणि मोठा उत्सव म्हणजे दिवाळी भारतात सर्व धर्मीय लोक यास मोठ्या आनंदात साजरा करतात.

हा आनंद, सुख, शांती, रोषणाई, उल्हास, उत्सवाचा, प्रेमानी भरलेला, मैत्रीचा आणि माणुसकीचा मंत्र जपणारा उत्सव आहे.कोजागिरी पौर्णिमेनंतर खऱ्या अर्थाने दिवाळी या सणाची सर्वच वाट पाहत असतात.

दिवाळी हा सण कधी आहे :- (diwali 2021)

शरद ऋतूच्या ऐन मध्यभागी हा सण येतो. आश्विन वद्य द्वादशी ते कार्तिक शुद्ध द्वितीया हे सहा दिवस या सणाचे असतात.आश्विन व कार्तिक महिन्याच्या शेवटी म्हणजेच ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर मध्ये दिपावली हा सण उत्सव असतो.. यावर्षी कार्तिक अमावास्या 4 नोव्हेंबर 2021 रोजी आहे.

दिपावलीचे ऐतिहासिक महत्त्व:-

हिंदू धर्मामध्ये प्राचीन काळापासून दिवाळी सणाला खूप महत्व असलेले आपणा सर्वाना माहीत आहे. चौदा वर्षांचा वनवास संपवून रामचंद्र सीतेसह अयोध्येला परत आले अशी पुर्वीपासून सर्वांची धारणा आहे.

दिपावलीच्या सहा दिवसांच्या काळात महालक्ष्मीची मनापासून पूजा केली जाते. दिपावलीतील लख्ख दिवे दु:ख, नैराश्य आणि अपयशाचा अंधकार दुर करतात असे सर्वाची मनोभावना असते.

दिपावलीतील महत्त्वाचे दिवस :-

*वसुबारस:-

आश्विन कृष्ण द्वादशीस, या दिवशी मोठ्या उत्सावात वसुबारस हा दिवाळी सण उत्सव साजरा करण्यात येतो. या दिवशी सायंकाळी घराच्या अंगणात सडा-सारवण करून सुंदर सुंदर रंगाची आकर्षक रांगोळी काढली जाते

भारतीय संस्कृतीत गाईला महत्त्वाचे स्थान असल्याने या दिवशी गाय आणि तिच्या वासराची पुजा केली जाते . गाईला हळदी कुंकू लावून तिच्या गळ्यात फुलांची माळ घातली जाते. लख्ख निरांजनाने तिला धान्य, गुळ किंवा पोळीचा नैवेद्य दिला जाते गाईला ओवाळत असताना,

दिन दिन दिवाळी,

गाई म्हशी ओवाळी,

गाई-म्हशी कुनाच्या,

लक्षुमनाच्या.

लक्षुमन कुनाचा, आई-बापाचा

दे माई खोबऱ्याची वाटी,

वाघाच्या पाठीत घालीन काठी.!!

असे सुंदर गाणे म्हणटले जाते. या दिवशी घरांत लक्ष्मीचे आगमन व्हावे, मुला बाळांना उत्तम आरोग्य लाभावे आणि घरात सुख, समुद्धी नांदावी म्हणुन वसुबारस मोठ्या आनंद उत्सावात साजरी होते.

  • धनत्रयोदशी :-

हिंदू संस्कृतीत आश्विन कृष्ण त्रयोदशीस या दिवशी धनत्रयोदशी साजरी केली जाते. या दिवशी धनाला फार मोठे महत्त्व असते. या दिवशी महालक्ष्मी, कुबेर,विष्णू, योगिनी, श्री गणेश, नाग देवता आणि घरातील पैसे सोन्या चांदीच्या अलंकारांची पूजा करून त्यांना गुळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य दाखविला जातो.

या दिवशी वस्त्र आणि सोन्या चांदीचे अलंकार खरेदी करणे शुभ मानतात. या दिवशी वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्ती  धन्वतंरी या देवाची पुजा करतात आयुर्वेदाच्या दृष्टीने हा दिवस धन्वंतरी जयंतीचा असतो.

फार पूर्वी पासून एक दंतकथा आहे की,  असुरांबरोबर इंद्रदेव यांनी महर्षि दुर्वास यांच्या शाप निवारणाकरिता समुद्र मंथन केले, तेव्हा त्यातून देवी लक्ष्मी प्रगट झाली.तसेच समुद्र मंथनातून धन्वंतरी अमृतकुंभ बाहेर घेऊन आला.

म्हणून धन्वंतरीचीही या दिवशी पूजा केली जाते.हा दिवस भारतात राष्ट्रीय आयुर्वेद दिवस म्हणूनही साजरा होतो.धन्वंतरी हा उत्सव अमृतत्व आणि धनसंपत्ती देणारा उत्सव म्हणुन साजरा होतो.

  • नरक चतुर्दशी :-

आश्विन कृष्ण चतुर्दशीच्या दिवशी नरक चतुर्दशी हा सण तसेच उत्सव साजरा केला जातो. नरकचतुर्दशीच्या दिवशी अलक्ष्मीचे पहाटे मर्दन करून आपल्यातील नरकरूपी पापवासनांचा नायनाट गर्व आणि अहंकाराचे उच्चाटन केले जाते.

यातुन सकारात्मक विचारांच्या तेजाची आत्मज्योत प्रकाशित होते असे मानले जाते. ही पहाट मनविकासासाठी व आरोग्यसाठी फलदायी मानली जाते. या दिवशी अभ्यंगस्नानालाही  महत्त्व असते.

या दिवशी पहाटे लवकर उठून,पहाटच्या प्रसन्न वातावरणात सुवासिक उटणे लावून, सूर्योदयापूर्वी केलेले स्नान यालाच आपल्या संस्कृतीत अभ्यंगस्नान असे म्हणतात.

नरक चतुर्दशीच्या या प्रसन्न व शुभ पहाटेपासूनच  फटाके उडवायला सुरुवात होते. या दिवसाला दिपावली पहाट असे सुद्धा म्हणतात या दिवशी पहाटेपासून सुरेल  संगीत आणि गीत गायनाचा कार्यक्रमही ठिक  ठिकाणी साजरा केला जातो .

  • लक्ष्मीपुजन :-

दिवाळीचा लक्ष्मीपुजन हा  दिवस, सर्वात महत्वाचा मानला जातो. या दिवशी श्री महालक्ष्मीची मनोभावे पूजन केले जाते. ह्या दिवशी सूर्य आपल्या दुसऱ्या चरणात प्रवेश करतो आणि अमावस्या असूनही ह्या दिवसाला अतिशय शुभ मानल्या जाते.

पहाटेच दाराभोवती सडा- सारवण करून सप्तरंगी रांगोळी काढली जाते. घराच्या दाराला पानाफुलांचे तोरणे लावले जाते. फटाक्यांच्या अताषबाजीने वातावरणास शोभा वाढते.

छोट्या छोट्या दिव्यांनी सारे घर आणि अंगण  उजळून निघते.या दिवशी सायंकाळी लक्ष्मीचे पूजन केले जाते. पाटावरती महालक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो ठेवून तीला फुलपुष्प हळदी कुंकू वाहीले जाते.

त्या शेजारी तांदळाच्या स्वातिकावर कळस ठेवला जातो. या समोर सुंदर रांगोळी काढली जाते. त्यावर वाटी किंवा तबक ठेवतात. मग त्याच्यामध्ये सोन्याचे दागिने आणि चांदीचा रुपया, इत्यादी दागिने ठेवून त्यांची पूजा केली जाते.

या पुजेला बत्तासे आणि साळीच्या लाह्यांचा नेवैद्य वरोबर दिवाळीचा फराळाचा नैवेद्य दाखविला जातो.   तसेच  केरसुणी विकत घेऊन तिलाच लक्ष्मी मानून तिच्यावर पाणी घालून हळद-कुंकू वाहतात.

घरात वापरण्यास सुरुवात करतात.कुबेर हा देवांचा खजिनदार आणि धनसंपत्तीचा स्वामी मानला जातो. त्यांचीही मनोभावे पूजा केली जाते.

धनसंपत्ती, भरभराट व समृद्धीचा  आशिर्वाद महालक्ष्मीकडे मागीतला जातो असे मानले जात असते.भगवान बुद्ध यांनी म्हटले आहे, “आपो दीपो भवः”, म्हणजे तुम्ही स्वताच प्रकाश रूपी व्हा.आणि सकारात्मकतेचा प्रकाश ह्या दिवशी आत्मसात करा असा त्याचा अर्थ होतो.

लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने ‘आर्थिक व्यवहारातील सचोटी, नीती ‘ आणि ‘अर्थप्राप्तीच्या साधनांविषयी कृतज्ञता’ व त्यांचीही मनोभावे पूजा केली जाते.या दिवसा पासून व्यापाऱ्यांच्या नववर्षाची सुरुवात होते. हा दिवस शुभ, सुख,शांती आणि समृद्धी चा मानला जातो.

*बलप्रतिपद/दिपावली पाडवा :-

कार्तिक शुद्ध प्रतिपदे हा दिवस बलिप्रतिपदा म्हणुन साजरा  होतो.हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून ही ओळखला जातो, या  दिवशी बळी राजाचे  चित्र काढुन त्याचे  पूजन  केले जाते आणि ‘इडा पीडा टळो व बळीचे राज्य येवो’ असे शुभ गीत म्हणटले जाते.

लोक दिवाळीतील पाडव्याला  नववर्षाची सुरुवात मानतात. ह्या दिवशी घरोघरी सायंकाळी पाटाभोवती रांगोळी काढून पत्नी आपल्या पतीचे औक्षण करत असते व पती पत्नीला ओवाळणी घालत असतो. नवविवाहित दांपत्य आपली पहिली दिवाळी पत्नीच्या माहेरी साजरी करत असतात.

*गोवर्धन पुजा :-

मथुरेकडील लोक बलिप्रतिपदेच्या दिवशी सकाळी गोवर्धन पर्वताची पूजा करतात.तसेच बऱ्याच ठिकाणी गोवर्धन पर्वताची प्रतिकृती तयार करून त्याची पुजा केली जाते. गोवर्धन पूजा ही हिंदू संस्कृतीत महत्त्वाची मानली जाते.

*भाऊबीज :-

कार्तिक शुद्ध द्वितीयेस भाऊबीज हा सण साजरा केला जातो.हा दिवस बहिण भावाच्या नात्यातील प्रेमसंवर्धानाचा  हा दिवस मानला जातो. भाऊ बहीणीला ओवळणी घालतो. बहीण भावाशी सुख दुःखा विषयी हितगुज करते. या दिवसाने बहीण भावाचे नाते ऋणानुबंध होते.

क्रोध, मत्सर असो वा भय, ह्या सर्व नकारात्मक गोष्टींचा अंत होऊन आयुष्य समृद्ध होत जाते. दिवाळीचे प्रत्येक क्षण प्रत्येकांच्या आयुष्यात गोड गोडवा निर्माण करतात.

दिवाळीत अनेकजण नात्यागोत्याकडे जातात आणि नाती ऋणानुबंध करतात.लहान थोर सर्वजण फटाके उडविण्याचा आनंद घेतात.

दिवाळी प्रत्येकाला नवचैतन्य, सकारात्मकता देत असते !

दिवाळीनिमित्त प्रतिवर्षी मराठी तसेच अन्य भाषिक साहित्य क्षेत्रात दिवाळी अंक प्रकाशित केले जातात.यातुन साहित्याची देवाण घेवाण होते. साहित्यिकांना यातून व्यासपीठ मिळते.

दिवाळीत मुले किल्ला तयार करतात. यातुन  ऐतिहासिक वारसा जपला जातो. दिवाळीत मनात कानाकोपऱ्यात समृद्धीचा सुख शांती आनंदाचा दरवळ दरवळत असतो.प्रत्येक दिवाळी प्रत्येकाला नवचैतन्य, सकारात्मकता देत असते.

भारतातील विविध समाजांची दिवाळी

जैन समाज : आश्विन अमावास्येला जैनांचे २४वे तीर्थंकर भगवान महावीर मोक्षाला गेले. त्या दिवशी महावीरांना जलाभिषेक करून त्यांची पूजा करतात, दिवे उजळतात आणि त्यांना ‘निर्वाण लाडूं’चा भोग चढवतात. आणि नंतर फटाक्यांची आतशबाजी करतात.

आंध्रातील तेलुगू समाज : ही मंडळी नरक चतुर्दशीलाच दिवाळी म्हणतात. त्या दिवशी कागदाचा किंबा बांबूचा नरकासुराचा पुतळा करून त्याचे दहन करतात, मग दिवे लावतात व लक्ष्मीपूजन करतात.

बंगाली समाज : दिवाळीच्या दिवशी बंगाली लोक कालीबाड्यांत जाऊन कालीची पूजा करतात. रात्री जागरण करून भजने म्हणतात. दीपावलीच्या रात्री घरोघर व मंदिरांत दिवे लावतात. त्यांचे लक्ष्मीपूजन पंधरा दिवस आधी, म्हणजे शरद पैर्णिमेलाच झालेले असते.

बौद्ध समाज : गौतम बुद्ध दिवाळीच्या दिवसांतच तप करून परत आले होते. त्याच दिवशी बुद्धांचा प्रिय सहकारी अरहंत मुगलयान हा निर्वाणाला गेला. त्याची आठवण काढून बौद्ध मंडळी गौतम बुद्धाला प्रणाम करून दिवे लावतात.
तमिळ समाज : प्रत्येक घरातून स्त्री-पुरुष एकेक जळती पणती देवळात नेऊन ठेवतात, आणि तेथेच बसून रात्रभर भजन करतात.

महाराष्ट्रातील मराठी समाज : लक्ष्मी पूजन सोडले तर मराठी लोकांच्या दिवाळी कुठलाही धार्मिक विधी नाही. खाणे-पिणे सणांचा आनंद लुटणे, मित्र-मैत्रिणींच्या, आप्तांच्या भेटी घेणे, एकमेकांच्या घरी फराळाला जाणे, त्यांना आपल्या घरी बोलावणे, रात्री फटाक्यांची आतशबाजी करणे ही यांची दिवाळी.

ती रमा एकादशीपासून (आश्विन कृष्ण एकादशीपासून) सुरू होते. त्या रात्री फक्त तुळशीपुढे तेल-वात घालून उजळवलेली पणती ठेवतात. दुसरा दिवस वसू बारस.

या दिवसापासून रोज भरपूर पणत्या लावून विजेच्या दिव्यांची रोषणाई करतात. घराबाहेर रांगोळी काढतात. आकाशकंदील लावतात. घरात गवारीची भाजी आणि बाजरीच्या भाकरीचा बेत असतो. तिसरा दिवस धन त्रयोदशी.

ज्या बायकांनी आधीपासूनच दिवाळीचा फराळ, म्हणजे लाडू, करंज्या, शंकरपाळी, कडबोळी, शेव-चकली-चिवडा करायला सुरुवात केली नसेल तर ती करून काम लवकरात लवकर संपवतात.

ज्या घरात फार माणसे असतील त्या घरातील स्त्रिया या दिवशी ‘बायकांची न्हाणी’ उरकून घेतात. चौथा दिवस – नरक चतुर्दशी. अगदी पहाटे उठून आधल्या दिवशी स्वच्छ केलेल्या संडासात पणती ठेवतात.

पहाटेच घराबाहेर पणत्या ठेवतात आणि रोषणाई करतात. घरातील लोकांचे, विशेषत: पुरुषांचे, सूर्योदयापूर्वीच तेल उटणे लावून अभ्यंगस्नान होते. लोक आंघोळ करत असताना फुलबाज्या लावतात आणि फटाके फोडतात.

नंतर सर्वजण फोडणीचे किंवा दडपे पोहे खातात. दिवाळीचा फराळ खाणे येता जाता चालूच असते. शेजारा-पाजाऱ्यांना फराळाची ताटे पाठवतात. त्यांच्याकडूनही ताटे येतात.

ज्यांच्या घरात काही अशुभ घडल्याने दिवाळी नसते त्यांना आवर्जून फराळाचे जिन्नस आणि मुलांसाठी फटाके पाठवतात. पुढचा दिवस लक्ष्मीपूजनाचा. या दिवशी संध्याकाळी लक्ष्मीची साग्रसंगीत पूजा होते.

ही पूजा घरातला कर्ता पुरुष करतो. लक्ष्मीच्या मूर्तीशेजारी, काही दागिने आणि बंदे रुपये ठेवतात. त्यांचीही पूजा होते. प्रसादासाठी लाह्या-बत्तासे-डाळिंबाचे दाणे एकत्र करून एका तबकात ठेवलेले असतात.

घरात या दिवसासाठी मुद्दाम केलेले अनरसेही ठेवतात. पूजेनंतर प्रसाद वाटतात व खातात. पुढचा दिवस दिवाळीच्या पाडव्याचा. जेवणाचा बेत श्रीखंडपुरी, उकडलेल्या बटाट्याची सुकी भाजी.

या दिवशी स्त्रिया नवरा, दीर, सासरे आदींना ओवाळतात. नंतरचा दिवस भाऊबीजेचा. यासाठी भाऊ बहिणींच्या घरी जाऊन फराळ करतात किंवा जेवतात आणि ओवाळून घेतात.

घराबाहेर पणत्या लावायचा आणि फटाके उडवण्याचा हा दिवाळीतला शेवटचा दिवस. कार्तिक शुद्ध एकादशीच्या दिवसापासून पौर्णिमेपर्यंत पुन्हा एकदा छोट्या प्रमाणात रोषणाई करून घरातले उरलेसुरले फटाके फोडून संपवतात. दिवाळीत बनवलेले व न संपलेले फराळाचे जिन्नस पुढच्या दिवसांत खाऊन संपवतात.

अशा प्रकारे आजच्या लेखातुन आपण दिवाळी ह्या सणाविषयी माहीती जाणुन घेतली आहे.तरी आपल्याला ही माहीती कशी वाटली आम्हाला आपली याबाबदची प्रतिक्रिया नक्की कळवा आणि ही माहीती इतरांसोबत देखील शेअर करा.

आपणास दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा !