अहमदनगर Live24 टीम, 12 जून 2021 :- जिल्ह्यात कोरोना महामारीचा काळ सुरु आहे. यामध्ये अनेकांचे प्राण गेले आहे. नागरिक स्वतःचा जीव वाचवण्यासाठी धडपड करत आहे.

नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रशासन देखील उपाययोजना करत आहे. एकीकडे हे सगळं सुरु असताना मात्र दुसरीकडे मिरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मुदतबाह्य औषधे आढळल्याने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी कर्मचार्‍यांना चांगलेच फटकारले.

मिरी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या हवेतून ऑक्सिजन निर्मिती प्लॅन्टचे उद्घाटन क्षीरसागर यांच्या हस्ते झाले. त्यानंतर त्यांनी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देत करोना परिस्थितीचा आढावा घेतला.

तुमच्यावर लोकांचा विश्‍वास नाही का…. करोनाव्यतिरिक्त दिवसभरात बारा रुग्ण तपासणीसाठी आल्याचे त्यांना सांगण्यात आले. तसेच गेल्या तीन महिन्यांत केवळ तीन महिलांची प्रसूती येथे झाल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. हरिभाऊ गाडे यांनी सांगितले.

यावर बारा हजार लोकसंख्येच्या गावात दिवसभरात फक्त बारा लोक तपासणीसाठी येतात. तुमच्यावर लोकांचा विश्‍वास नाही का? जनतेच्या जीवाशी खेळू नका, जबाबदारीने काम करा अशा शब्दांत क्षीरसागर यांनी कर्मचार्‍यांची चांगलीच कानउघडणी केली.

औषधांच्या स्टॉकची पाहणी करताना मुदतबाह्य औषधे क्षीरसागर यांना आढळले. त्यांनी ही बाब गटविकास अधिकारी शीतल खिंडे यांच्यासह वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गाडे यांच्या निदर्शनास आणून देत दोघांनाही धारेवर धरले.

या प्रकाराबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी नेमकी कोणावर आणि काय कारवाई करणार याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.