अहमदनगर Live24 टीम, 16 ऑक्टोबर 2021 :- मी राज्याचा मुख्यमंत्री आहे असं कधीच मला वाटू नये. माझ्या जनतेलाही तसं वाटू नये. कारण त्यांना मी त्यांच्या घरातला वाटलो पाहिजे.

जे मी पुन्हा येईन पुन्हा येईन बोलत होते आता ते मी गेलोच नाही असं म्हणू लागलेत. आता तुम्ही बसा तिकडेच”, अशा शब्दात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा समाचार घेतला आहे.

शिवसेनेचा परंपरागत दसरा मेळावा यंदा मुंबईतील षण्मुखानंद सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला.

माझं तर सोडाच तर माझ्या तमाम जनतेला मी मुख्यमंत्री आहे, असं कधीच वाटता कामा नये. मी घरातलाच आहे, मी तुमचा भाऊ आहे,

असं वाटायला हवं, अशी इच्छा ईश्वरचरणी करतोय. कारण मी पुन्हा येईन म्हणत होते, ते बोलत आहेत मी गेलोच नाही, बसं तिकडेच. पण जे संस्कार आणि संस्कृती असते ती हीच असते.

पदं आणि सत्ता काय आहेत? पदं येतील जातील. पण कधीही अहमपणा कधी डोक्यात येऊ देऊ नको. ज्यादिवशी डोक्यात हवा जाईल, त्यादिवशी तू संपलास, अशी माझ्या वडील आणि आजोबांची शिकवण आहे, असंही उद्धव ठाकरेंनी अधोरेखित केलंय.

सीबीआय, ईडीच्या जोरावर आव्हानं देऊ नका…

कोणी अंगावर आलं, तर शिंगावर घेऊ आणि मी हे आव्हान माझ्या शिवसैनिकांच्या जीवावर देतोय. पोलीस आणि प्रशासनाच्या जीवावर आव्हान देत नाही. तुम्हाला अंगावर यायचं असेल तर स्वत:च्या जीवावर आव्हानं द्या.

सीबीआय, ईडीच्या जोरावर आव्हानं देऊ नका. आव्हानं द्यायचं आणि मग पोलिसांच्या मागे लपायचं याला हिंदुत्व म्हणत नाही. त्याला नामर्दपणा म्हणतात, असं ठाकरे म्हणाले.