ऐन लोकसभेपूर्वी भाजपच्या डोक्याला ताप, संगमनेरनंतर आता नेवासामध्ये भाजप पदाधिकाऱ्यांची धुसपूस, ‘या’ नेत्याने पक्षाला ठोकला राम-राम

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar Politics News : भारतीय निवडणूक आयोग आता कोणत्याही क्षणी निवडणुकांच्या तारखा जाहीर करेल आणि देशात आचारसंहिता लागू होणार आहे. अशा परिस्थितीत, सध्या महाराष्ट्रासहित संपूर्ण देशातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. सध्या महायुतीमध्ये आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून गदारोळ सुरू आहे.

महायुतीमध्ये आणि महाविकास आघाडीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार ? याकडे सबंध महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे. अशातच, मात्र अहमदनगर जिल्ह्यातून भाजपाची डोकेदुखी वाढवणारी बातमी समोर येत आहे. जिल्ह्यातील उत्तर भागात भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये चांगलीच धुसफूस पाहायला मिळत आहे.

संगमनेर तालुका भाजप कार्यकारणीतील वाद नुकत्याच काही दिवसांपूर्वी ऐरणीवर आला होता. अशातच, आता नेवासामध्ये देखील पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी नाट्य पाहायला मिळाले आहे. विशेष म्हणजे नेवासा येथील एका पदाधिकाऱ्याने पक्षाला राम-राम देखील ठोकला आहे.

यामुळे नेवासा तालुक्यातील  भाजप पदाधिकाऱ्यांचे मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. खरेतर, भाजप हा खूपच शिस्तप्रिय पक्ष आहे. या पक्षाचे अंतर्गत वाद हे नेहमीच सहमतीने सोडले जात असतात. या पक्षातील वाद कधीच वादळात परावर्तित होत नाहीत. हेच भाजपाचे यशाचे गमक आहे.

मात्र नेवासा तालुक्यातील पदाधिकाऱ्यांचा वाद हा चांगलाच विकोपाला पोहोचला आहे. यामुळे ऐन लोकसभेपूर्वीच भाजपाची डोकेदुखी वाढणार असे बोलले जात आहे. आम्ही आपणास सांगू इच्छितो की, नेवासा तालुका हा भाजपा नगर उत्तरचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांचे होम ग्राउंड आहे.

पण, येथेच पक्षातील पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी वाढत आहे. विशेष म्हणजे, नेवासातील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दत्तात्रय काळे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत शिवसेनेचे आमदार शंकरराव गडाख यांच्या गटात सामील झाले आहेत.

परिणामी, विठ्ठलराव लंघे यांच्यासाठी हा एक मोठा सेटबॅक समजला जातोय. विठ्ठलराव लंघे आणि माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्यासाठी ऐन लोकसभा निवडणुकांपूर्वीच पक्षाच्या पदाधिकाऱ्याने पक्षाची साथ सोडली असल्याने हा मोठा राजकीय धक्का असल्याचे बोलले जात आहे.

दत्तात्रय काळे यांच्यासह भेंडा बुद्रुकचे उपसरपंच पंढरीनाथ फुलारी, देवगावचे सरपंच विष्णू गायकवाड, सदस्य देवेंद्र काळे, रवींद्र गायकवाड, भाऊसाहेब गायकवाड, गणेश गायकवाड, सरपंच सोपानराव लोखंडे, तुकाराम दामोदर कोलते यांनी देखील गडाख गटात प्रवेश केला आहे. असे बोलले जाते की, दत्तात्रय काळे यांचा कुकाणा, चांदा, भेंडा या भागात चांगला तगडा जनसंपर्क आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणूक सुरू होण्याआधीच काळे यांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिली असल्याने भाजपासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. लोकसभेच्या निवडणुकीत या घटनेचा फारसा परिणाम पाहायला मिळणार नाही मात्र लोकसभेनंतर पंचायत समितीच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे आणि त्यावेळी या घडामोडीचा निवडणुकीवर थेट परिणाम पाहायला मिळू शकतो.

2014 आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकीत देखील दत्तात्रय काळे यांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती. आता मात्र त्यांनीच पक्षाची साथ सोडली असल्याने भाजपामधील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आला असल्याचे चित्र आहे. यामुळे, आता भाजपाच्या वरिष्ठांकडून या घटनेकडे कसे पाहिले जाते आणि हा वाद लवकरात लवकर सोडवण्यासाठी भाजप काय प्लॅन रेडी करते हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.