Lok Sabha Election 2024:- लोकसभा निवडणूक 2024 अगदी जवळ येऊन ठेपली असून सात टप्प्यात ही निवडणूक संपूर्ण देशात पार पाडली जाणार आहे तर महाराष्ट्रात या निवडणुकीचे पाच टप्पे आहेत. यातील पहिल्या टप्प्यातील प्रचाराला दणक्यात सुरुवात झालेली असून लवकर दुसरा टप्प्यातील उमेदवारांची अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.
त्यामुळे एकंदरीत संपूर्ण देशामध्ये या लोकशाहीच्या उत्सवाचे वातावरण आहे. त्यामुळे या महत्त्वाच्या असलेल्या निवडणुकीसाठी प्रत्येक नागरिकांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावणे खूप गरजेचे आहे. तसेच अनेक सामाजिक संस्था तसेच शालेय विद्यार्थ्यांकडून मतदानाचा टक्का वाढावा याकरिता जनजागृती देखील केली जात आहे.
परंतु बऱ्याचदा जेव्हा मतदान करायला मतदार जातात तेव्हा त्यांना काही प्रकारच्या समस्या येऊ शकतात. जसे की मतदान केंद्र नेमके कोणते आहे?ओळखपत्र क्रमांक नसेल तर यादीमध्ये नाव कसे शोधावे? यासारखे प्रश्न किंवा समस्या मतदारांना येत असतात. याकरिता निवडणूक आयोगाच्या माध्यमातून देखील अनेक उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. जेणेकरून मतदारांना येणाऱ्या समस्या ताबडतोब सोडवता येतील. यासंबंधीचेच माहिती आपण या लेखात बघणार आहोत.
मतदानासाठी जा परंतु यापैकी एक ओळख पत्र सोबत न्या
स्वतःचा फोटो असलेले मतदार ओळखपत्र, आधार कार्ड, मनरेगाचे जॉब कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट, फोटो असलेले पेन्शन बुक, ड्रायव्हिंग लायसन्स, बँक किंवा पोस्ट ऑफिसचे पासबुक( पासबुक वर फोटो असणे गरजेचे), कामगार मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत दिलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड,
खासदार आणि आमदारांना दिलेले अधिकृत ओळखपत्र, सामाजिक न्याय विभागाकडून दिव्यांग बांधवांना देण्यात आलेले ओळखपत्र, नोंदणी महानिबंधकातर्फे राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी अंतर्गत दिलेले स्मार्ट कार्ड आणि राज्य किंवा केंद्र सरकार, सार्वजनिक उपक्रम तसेच सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना दिलेले ओळखपत्र यापैकी कोणतेही एक ओळखपत्र तुम्हाला गरजेचे राहील.
मतदान करण्याकरिता मतदान केंद्राचा शोध कसा घ्याल?
1- याकरिता तुम्ही वोटर हेल्पलाइन एप्लीकेशन चा वापर करू शकता.
2-www.nvsp.in या संकेतस्थळाला भेट देऊन शोध घेऊ शकता.
3- याशिवाय तुम्ही 1950 या हेल्पलाइन क्रमांकावर देखील कॉल करून त्यासंबंधीची माहिती मिळवू शकतात.
4-ECIPS< स्पेस>EPIC क्रमांक टाकून तुम्ही १९५० या नंबर वर मेसेज पाठवून या संबंधीची माहिती मिळू शकतात.
ओळखपत्र क्रमांक नाही तर मतदार यादीमध्ये नाव कसे शोधाल?
1- करता तुम्हाला सर्वप्रथम इलेक्शन कमिशनच्या https://voters.eci.gov.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.
2- त्यानंतर सर्च इन इलेक्टोरल रोल यावर क्लिक करावे.
3- त्यानंतर सर्च बाय डिटेल्स हा पर्याय निवडावा.
4-त्यानंतर संपूर्ण नाव, वय, लिंग, तुमचे राज्य तसेच जिल्हा आणि मतदार संघ इत्यादी महत्वपूर्ण माहिती भरावी.
5- त्यानंतर दिलेला कॅप्चा कोड नमूद करून सबमिट करावा व सर्च ऑप्शन वर क्लिक करा.
6- त्यानंतर तुमचे ओळखपत्र क्रमांक पासून मतदान केंद्रापर्यंतचे सर्व माहिती तुम्हाला त्या ठिकाणी मिळते.
मतदाना संदर्भात काही माहिती हवी असेल तर या हेल्पलाइन नंबर वर कॉल करा
तुम्हाला देखील मतदान किंवा निवडणूक संदर्भातील कोणतीही माहिती मिळवायची असेल तर तुम्ही 1950 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधू शकतात.
मतदार ओळखपत्रातील EPIC क्रमांक म्हणजे नेमके काय असते?
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या माध्यमातून भारताचे प्रत्येक रजिस्टर म्हणजेच नोंदणीकृत असलेल्या मतदाराला एक युनिक क्रमांक जारी करण्यात आलेला असून त्यालाच आपण मतदार ओळखपत्र म्हणून ओळखतो. हा क्रमांक अक्षरी आणि अंकाच्या एकत्रीकरणातून बनलेला अल्फा नुमेरिक 10 अंकी कोड असतो. मतदार ओळखपत्राच्या पुढच्या बाजूला तो प्रिंट केलेला असतो. हा क्रमांक प्रत्येक मतदारांकरिता एक युनिक आयडेंटिफायर म्हणून काम करतो.