विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये काटे की टक्कर होणार असून मतदारांना आकर्षित करण्याच्या दृष्टिकोनातून दोन्ही आघाड्यांच्या माध्यमातून जोरदार प्रयत्न सुरू असल्याचे दिसून येत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती म्हणजेच भाजप, शिंदे सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या माध्यमातून निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला व या जाहीरनाम्यामध्ये अनेक महत्त्वाचे अशी आश्वासने देण्यात आलेली आहेत.
हा जाहीरनामा बघितला तर यामध्ये बऱ्याच घटकांचा विचार करून त्या दृष्टीने हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आल्याचे आपल्याला दिसून येते. या जाहीरनाम्यामधील जर ठळक बाब आपण बघितली तर ती म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या बाबतीत दिसून येत आहे.
सध्या राज्यात लाडकी बहीण योजना खूप लोकप्रिय ठरली असून या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये महिलांना मिळत आहेत.
परंतु जाहीरनाम्यानुसार बघितले तर महायुतीचे सरकार आल्यानंतर या रकमेत वाढ केली जाणार असून महिलांना मिळणाऱ्या पंधराशे रुपये ऐवजी ही रक्कम 2000 रुपये पर्यंत वाढवण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
इतकेच नाही तर इतर गोष्टींचे आश्वासने देखील यामध्ये खूप महत्त्वाचे आहेत. केलंय काम भारी, आता पुढची तयारी अशा टॅग लाईन खाली हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आलेला आहे.
महायुती सरकारची लाडकी बहीण योजना ठरली प्रचंड लोकप्रिय
आपल्याला माहित आहे की महायुती सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संपूर्ण महाराष्ट्र मध्ये लोकप्रिय ठरली असून या योजनेच्या माध्यमातून महिन्याला दीड हजार रुपये महिलांच्या खात्यावर वर्ग करण्यात येतात. आतापर्यंत जवळपास अडीच कोटी महिलांच्या नावावर तीन हप्ते वर्ग करण्यात आलेले आहेत.
परंतु सध्या आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने या योजनेच्या अंमलबजावणीला स्थगिती दिलेली आहे. आपल्याला माहित आहे की विरोधकांनी प्रचंड प्रमाणावर या योजनेच्या विरोधात टिकेची झोड उठवली होती. अनेक प्रकारचे संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न देखील केला गेला होता.
परंतु ही योजना बंद होणार नाही यासंबंधीचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून अनेकदा देण्यात आले आहे. आता महायुतीच्या जाहीरनाम्यानुसार बघितले तर महायुतीचे सरकार आल्यानंतर पंधराशे रुपयांची रक्कम वाढवून ती आता 2100 रुपये करण्यात येईल अशा प्रकारचे आश्वासन देण्यात आलेले आहे.
लाडकी बहिणी योजना आर्थिकदृष्ट्या राबवणे अशक्य असल्याचे विरोधकांच्या माध्यमातून वारंवार सांगण्यात आले. परंतु जेव्हा अर्थसंकल्प सादर केला गेला तेव्हाच या योजनेकरिता सरकारने 46000 कोटी रुपयांची तरतूद करून ठेवली आहे
व त्या माध्यमातून महिलांना त्यांच्या लाभाची रक्कम दिली जात आहे. तसेच या जाहीरनाम्यामधील एक महत्त्वाची बाब अशी आहे की यामध्ये महिलांना प्राधान्य देताना तब्बल 25000 महिलांना आता पोलीस दलामध्ये समाविष्ट करण्याचे आश्वासन देखील दिले आहे.
वृद्धांना मिळणाऱ्या पेन्शनमध्ये होणार वाढ
तसेच या जाहीरनाम्यातील दुसरी महत्त्वाची बाब किंवा वचन बघितले तर ते वृद्ध पेन्शन धारकांसाठी खूप महत्त्वाचे आहे. आपल्याला माहित आहे की सध्या वृद्ध पेन्शनधारकांना एक हजार पाचशे रुपये पेन्शन स्वरूपात दिले जातात.
परंतु राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर ही रक्कम वाढवून 2100 रुपये इतकी केली जाईल असे वचन देखील यामध्ये देण्यात आलेले आहे.त्यामुळे वृद्ध पेन्शनधारकांसाठी ही दिलासादायक बाब ठरणार आहे.
अंगणवाडी व आशा सेविकांना पंधरा हजार रुपये वेतन मिळणार
तळागाळात काम करणाऱ्या अंगणवाडी आणि आशा सेविकांना 15 हजार रुपये वेतन आणि विमा संरक्षण देणार असल्याचे देखील या जाहीरनाम्यामध्ये नमूद करण्यात आलेले आहे.
त्यामुळे नक्कीच या आश्वासनाच्या माध्यमातून महिला कर्मचाऱ्यांना प्राधान्य देण्यात येऊन त्यांच्यासाठी ही समाधानकारक गोष्ट आहे. तसेच शेतीच्या दृष्टिकोनातून महत्वाचे असलेला विषय म्हणजे ग्रामीण भागातील रस्ते व अन्य पायाभूत सुविधा या महाराष्ट्राच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाच्या असून त्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रातील ग्रामीण भागामध्ये 45000 गावात पाणंद रस्ते बांधण्याचे देखील वचन या जाहीरनाम्यात देण्यात आलेले आहे.
वीज बिलात करणार 30 टक्के कपात
शेतकऱ्यांना मोफत कृषी वीज मिळण्याची योजना सरकारने यापूर्वी सुरू केलेली आहे. परंतु आता वीज बिलात तीस टक्के कपात करून सौर आणि अक्षय उर्जेवर भर देणार असल्याचे देखील महायुतीच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे.
तसेच येणाऱ्या भविष्यकाळात महाराष्ट्र कसा असेल व सरकारच्या कोणत्या कोणत्या योजना आहेत आणि त्यांच्या अंमलबजावणी कशी केली जाणार आहे? याबाबतची माहिती आणि दिशा दर्शवणारा व्हिजन महाराष्ट्र @ 2029 सरकार स्थापनेच्या 100 दिवसात सादर करण्याचे आश्वासन देखील या जाहीरनाम्यात देण्यात आले आहे.
सर्वच घटकांना समोर ठेवून प्रसिद्ध केला जाहीरनामा
महायुती सरकारचा जाहीरनामा बघितला तर यामध्ये तरुणांपासून तर महिला वर्ग व वृद्धांपासून तर शेतकऱ्यांपर्यंत अशा सर्वच घटकांचा बारकाईने विचार केला गेला असल्याचे दिसून येते.
सर्व घटकांसाठी विविध कल्याणकारी योजनांचे वचन या माध्यमातून देण्यात आल्याचे आपण पाहिले. व्यक्तिगत लाभाच्या योजनांचे वचन यामध्ये दिले आहेच.परंतु येणाऱ्या काळात महाराष्ट्र सक्षम करण्यासाठी व आर्थिक दृष्ट्या प्रगत करण्यासाठी ठोस उपाय योजना देखील यामध्ये सांगण्यात आल्या आहेत.