Model Code Of Conduct:- महाराष्ट्रामध्ये सध्या विधानसभा निवडणुकीचे वातावरण असून येणाऱ्या काही तासांमध्ये किंवा एक दोन दिवसाच्या आत मध्ये विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आपल्याला माहित आहेस की, कुठल्याही निवडणुकीची जेव्हा घोषणा होते तेव्हा लगेच आदर्श आचारसंहिता लागू होते व जेव्हा महाराष्ट्रामध्ये निवडणुकांची घोषणा होईल तेव्हा राज्यात देखील आदर्श आचारसंहिता लागू होईल.
आचारसंहिता लागू झाल्यानंतर मात्र राज्य सरकारवर अनेक प्रकारचे निर्बंध येतात व त्यामुळे आता जो काही कॅबिनेट बैठका आणि निर्णयांचा धडाका सरकारने लावलेला आहे तो यामुळेच. त्यामुळे या लेखात आपण आचारसंहिता म्हणजे नेमके काय व आचारसंहिता लागू आल्यानंतर काय करता येते व काय करता येत नाही? याबद्दलची माहिती थोडक्यात बघू.
आदर्श आचार संहिता म्हणजे नेमके काय?
देशामध्ये कुठल्याही प्रकारची निवडणूक ही स्वतंत्रपणे आणि पारदर्शक व निष्पक्षपणे पार पडावी याकरिता केंद्रीय निवडणूक आयोगाच्या माध्यमातून काही नियम ठरवले जातात व या नियमांनाच आचारसंहिता असे म्हटले जाते.
आचारसंहितेमुळे निवडणूक लढवणारे पक्ष तसेच सरकार इत्यादींवर काही बाबी न करण्याचे बंधने येतात. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आचारसंहितेचे पालन करणे हे प्रत्येक राजकीय पक्षासाठी व उमेदवारांसाठी बंधनकारक असते.
या माध्यमातून निवडणूक आयोग राज्यघटनेच्या कलम 324 नुसार केंद्र आणि राज्य सरकार तसेच निवडणुकीतील सर्व उमेदवार आणि पक्षांच्या कामगिरीवर देखरेख ठेवत असतात व त्याचा अधिकार निवडणूक आयोगाला प्राप्त होतो.
आचारसंहितेत काय करता येते व काय करता येत नाही?
1- आचारसंहिता लागू असताना राजकीय धोरणांवर टीका करता येते पण निवडणुकीत मते मिळावीत याकरिता एकमेकांची जात किंवा धर्म काढता येत नाही.
2- इतकेच नाहीतर आचारसंहिता जेव्हा सुरू असते तेव्हा मतदारांना आमिष देणे किंवा मतदारांना धमकावणे असे प्रकार आदर्श आचारसंहितेचे भंग करणारे ठरू शकतात.
3- आचार संहिता कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारची बैठक किंवा रॅली घेण्यापूर्वी पोलिसांची परवानगी घेणे सक्तीचे आणि अनिवार्य असते.
4- आपल्याला माहित आहे की बऱ्याचदा राजकीय आंदोलन किंवा सभेदरम्यान विरोधकांचा पुतळा जाळणे इत्यादी प्रकार घडतात. परंतु अशा प्रकारच्या एखाद्या सभेत विरोधकांचा पुतळा जाळणे हे आचारसंहितेच्या नियमात येत नाही.
5- सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आचारसंहिता कालावधीत मतदान केंद्रामध्ये कर्मचारी, संबंधित अधिकारी आणि मतदारांव्यतिरिक्त कोणालाही जाण्याची परवानगी नसते.
6- ज्या ठिकाणी मतदान केंद्र असते त्या केंद्रापासून साधारणपणे 100 मीटर अंतरापर्यंत कार्यकर्ते आपल्या पक्षाचा प्रचार करू शकत नाही.
7- समजा या सगळ्या नियमांचा किंवा आचारसंहितेचा भंग एखाद्या उमेदवाराच्या माध्यमातून केला गेला तर त्याची तक्रार निवडणूक आयोगाला नियुक्त केलेल्या निरीक्षकाकडे करता येते.
सरकारवर काय बंधन येतात?
जेव्हा आचारसंहिता लागू होते तेव्हा सत्ताधारी पक्षाला कुठल्याही प्रकारची सरकारी घोषणा किंवा नवीन योजना सुरू करता येत नाही. एखाद्या कामाचे उद्घाटन किंवा लोकार्पण तसेच भूमिपूजन असे कार्यक्रम देखील घेता येत नाहीत.
म्हणजे सरकारी गाडी तसेच सरकारी बंगला किंवा सरकारी विमानाचा वापर निवडणूक प्रचारासाठी करण्यास सक्त मनाई असते. तसेच कुठल्याही योजनेच्या बाबतीत सरकारला घोषणा करता येतच नाही परंतु मंत्र्यांना देखील अशा घोषणा करता येत नाहीत.
एखाद्या योजनेसाठीचा निधी देखील जाहीर करता येत नाही. एखाद्या पक्षाने जर पक्षाच्या कामाकरिता सरकारी यंत्रणेचा वापर केला तर तो आचारसंहितेचा भंग ठरतो. तसेच सरकारी माध्यमांचा वापर हा पक्षाच्या जाहिराती करता देखील करता येत नाही.