Nilesh Lanke : लोकसभा निवडणुकीत दोन लाखांहून जास्त मताधिक्क्याने आपण विजयी होणार असून माझा प्रत्येक कार्यकर्ता मंगळवारी दिवाळी साजरी करणार असल्याचे मा. आ. नीलेश लंके यांनी सांगितले.
आज लोकसभा निवडणूकीची मतमोजणी असून या पार्श्वभुमीवर लंके यांनी माध्यमांशी बोलताना आपला विजय निश्चित असल्याचा ठाम विश्वास व्यक्त केला.
लंके म्हणाले, १३ तारखेला मतदान झाले त्याच दिवशी निकाल जाहिर झालेला आहे.
माझ्या विजयाची फॉम्युलीटी शिल्लक आहे. मला निकालाची चिंता नाही, निकाल आमच्याच बाजूने लागणार आहे. मतदान झाल्यानंतर गावागावातील आमच्या कार्यकत्याँनी फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोष केला आहे. अनेकांनी गुलालाची उधळण केली. अनेक ठिकाणी अभिनंदनाचे फलक लागले असल्याचे लंके म्हणाले.
किती मताधिक्क्याने विजयी व्हाल या प्रश्नावर बोलताना लंके म्हणाले, मी दोन लाखांहून अधिक मतांनी विजयी होणार असून निकालाबाबत मनामध्ये कोणतीही धाकधूक नाही.
गुलाल आपलाचा असल्याचा दावा करतानाच उद्याच्या जल्लोषाची काय तयारी आहे या प्रश्नावर बोलताना लंके म्हणाले, माझी विशेष काही तयारी नसते, माझे सर्वच कार्यकर्ते दिवाळी साजरी करतील असे लंके यांनी सांगितले.
महाराष्ट्रात काय राजकीय चित्र असेल या प्रश्नावर उत्तर देताना राज्यात महाविकास आघाडीचे सर्वाधिक उमेदवार विजयी होतील असा विश्वास लंके यांनी व्यक्त केला. माझ्या किंवा कार्यकर्त्यांच्या मनामध्ये निकालाविषयी धाकधूक असती तर कार्यकर्त्यांनी शुभेच्छांचे फलक कशाला लावले असते ?
कार्यकर्त्यांना माझ्या विजयाचा विश्वास आहे. शेवटच्या स्तरातील कार्यकर्ता असो, माझ्या सोबत फिरणारा कार्यकर्ता असो किंवा महाविकास आघाडीचे नेते मंडळी असोत सर्वांना माझ्या विजयाबाबत खात्री आहे असे लंके म्हणाले.
या निवडणूकीत अतिशय खालच्या स्तरावर राजकारण केले गेले. अनेक आरोप, प्रत्यारोप करण्यात आले, या प्रश्नावर बोलताना लंके म्हणाले, या निवडणूकीत प्रशासनाचा मोठया प्रमाणावर गैरवापर करण्यात आला. सत्तेचा इतका गर्व योग्य नाही. हा गर्व निश्चित उतरेल असा टोलाही लंके यांनी विखे पिता- पुत्रांचे नाव न घेता लगावला.