काल लोकसभा निवडणुकीचे निकाल लागले व महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीने महायुतीचा दारुण पराभव केला. भारतीय जनता पार्टीचा गड समजल्या जाणाऱ्या विदर्भात देखील महायुतीला फक्त दोन जागा निवडून आणता आल्या व भारतीय जनता पार्टीला अवघ्या नऊ जागा मिळाल्या.
या सगळ्या पार्श्वभूमीवर बीजेपीच्या या मानहानीकारक पराभवाची जबाबदारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारली असून त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची तयारी केलेली आहे. पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी माझा राजीनामा स्वीकारून मला पूर्ण वेळ विधानसभेसाठी काम करण्याची संधी द्यावी असे देखील त्यांनी म्हटले आहे. देवेंद्र फडणीस यांनी अचानकपणे घेतलेल्या या भूमिकेमुळे भाजपच्या गोटामध्ये एकच खळबळ उडाली आहे.
भारतीय जनता पार्टीचा झाला मानहानीकारक पराभव
काल लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला व महायुतीने राज्यात अत्यंत खराब कामगिरी केली. एकूण लोकसभेच्या राज्यातील 48 जागांपैकी महायुतीला फक्त 17 जागा मिळाल्या व त्यातल्या त्यात भाजपाला अवघ्या नऊ जागा मिळाल्या. शिवसेनेला सात तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांना एक जागा मिळाली.
त्या तुलनेत महाविकास आघाडीचा विजयरथ पाहिला तर त्यांना तब्बल 30 जागांवर विजय मिळाला. यामध्ये काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला व काँग्रेसने 13 जागा मिळवल्या तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला 9 तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला आठ जागा मिळाल्या.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
देवेंद्र फडणवीस म्हणाले की महाराष्ट्र मध्ये आम्हाला अपेक्षेपेक्षा खूपच कमी यश मिळाले. महाराष्ट्रात आमची लढाई महाविकास आघाडी सोबत होती व विरोधकांनी आमच्या विरोधात संविधान बदलण्यासंबंधीचा एक नरेटीव सेट केलेला होता व हा नरेटीव मोडीत काढण्यात आम्हाला अपयश आले.
आम्हाला महाविकास आघाडीच्या आरोपांना प्रतिउत्तर देता आले नाही व त्याचा फटका आम्हाला बसला. परंतु आम्ही जनतेचा जनादेश मान्य करून पुढे जाण्याचा निर्णय घेतला असून ज्यांना जास्त जागा मिळाल्या आहेत त्यांची मी अभिनंदन करतो असे देखील देवेंद्र फडणीस यांनी म्हटले.
काँग्रेसच्या माध्यमातून काय आली यावर प्रतिक्रिया?
देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाच्या पराभवाचे नैतिक जबाबदारी घेतली असून त्यांनी महाराष्ट्रात 45 पारचे स्वप्न रंगवले होते. त्यानुसार केंद्रामध्ये भाजपाने चारशे पारची घोषणा दिली होती. पण भाजपा निकालांमध्ये तोंडघशी पडली व आता भाजपा त्यांना निवृत्त करते की काय हे पुढे कळेल अशी प्रतिक्रिया जेष्ठ काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी फडणीसांच्या या विधानावर दिली आहे.