सध्या संपूर्ण देशामध्ये लोकसभेच्या निवडणुकांचे वातावरण तापलेले असून संपूर्ण देशामध्ये सात टप्प्यात ही निवडणूक पार पडणार आहे तर महाराष्ट्रातील निवडणूक ही पाच टप्प्यात पूर्ण होणार आहे. महाराष्ट्रातील जर आपण राजकीय परिस्थिती पाहिली तर प्रमुख लढत ही भाजपा, काँग्रेस, शिवसेना( उद्धव ठाकरे गट) शिंदे गट,
राष्ट्रवादी शरद पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी( अजित पवार गट) यांच्यासोबतच वंचित बहुजन आघाडी व इतर प्रहार सारख्या काही पक्षांचा समावेश आहे. त्यामुळे आता येणाऱ्या कालावधीमध्ये जेव्हा प्रचाराची रणधुमाळी सुरू होईल तेव्हा मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध राजकीय पक्षांकडून आश्वासनांची खैरात केली जाईल.
परंतु या सगळ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या धामधुमीमध्ये महाराष्ट्रातील लोकसभेचा पहिला क्रमांकाचा मतदारसंघ व पहिल्या क्रमांकाचे मतदार कोण आहेत? हा देखील प्रश्न बरेचदा मनात आला असेल. त्याबद्दलची माहिती या लेखात घेऊ.
महाराष्ट्रातील लोकसभेचा पहिला क्रमांकाचा मतदार आणि मतदारसंघ कोणता?
आपण महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून बघितले तर लोकसभेच्या पहिल्या क्रमांकाचा मतदारसंघ म्हणून राज्यातील नंदुरबारची ओळख असून याच मतदारसंघातील पहिले मतदान केंद्र म्हणून अक्कलकुवा तालुक्यातील मणिबेलीचा समावेश होतो. तर सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे याच मतदार यादीतील पहिल्या क्रमांकाच्या मतदार आहेत 46 वर्षाच्या रविता पंकज तडवी या होय.
यांचे एक वैशिष्ट्य म्हणजे हे जरी महाराष्ट्रातील पहिले मतदार असल्या तरी त्या सध्या राहिला गुजरातमध्ये असून मतदान मात्र महाराष्ट्रात येऊन करणार आहेत.मतदार यादीतील पहिल्या क्रमांकावर रवीता पंकज तडवी या सध्या पुनर्वसित आहेत. त्यांचे पुनर्वसन गुजरात मधील परवेटा येथे झाले असून त्यांचे मतदान मात्र मणिबेल या ठिकाणीच आहे.
त्यामुळे ते या निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी या ठिकाणी येणार आहेत. या अगोदर विधानसभा निवडणुकीवेळी मतदार यादीत पहिले नाव वरसन वसावे यांचे होते. परंतु नंतर मणिबेली मतदान केंद्राच्या सुधारित यादीत त्यांचे नाव पहिल्या क्रमांकावरून खाली गेले आहे.
कसे आहे मणिबेली मतदान केंद्र?
मणिबेली हे मतदान केंद्र अतिशय दुर्गम भागामध्ये असून त्या ठिकाणी मतदान कर्मचाऱ्यांना दोन दिवस आधी निघावे लागते व नर्मदेच्या पाण्यातून प्रवास करत या ठिकाणी पोहोचावे लागते. मणिबेलीचे वैशिष्ट्य म्हणजे हे सरदार सरोवर प्रकल्पातील पहिली बुडीत गाव आहे.
तरी देखील या गावांमध्ये आजही 341 मतदार असून हे गाव गेल्या चार दशकांपासून कधी प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन तर कधी निवडणुकीतील वेगळेपण यामुळे कायम चर्चेत असते. या गावाचे पुनर्वसन झाल्यानंतर देखील सुमारे 450 नागरिक या ठिकाणी वास्तव्यास आहेत.
त्या ठिकाणचे दुर्दैव म्हणजे आज देखील या ठिकाणी जायला पक्का रस्ता नाही किंवा गावात वीज नाही. विशेष म्हणजे नर्मदेच्या काठावर असले तरी त्या ठिकाणी पाण्याची मोठ्या प्रमाणावर टंचाई दिसून येते. या सगळ्या परिस्थितीकडे लक्ष वेधावे याकरिता त्या ठिकाणच्या गावकऱ्यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता.