जो जनतेला त्रास देईल, गोर गरिबांची पिळवणूक करेल त्याला सोडणार नाही – डॉ. सुजय विखे पाटील

Ahmednagarlive24
Published:

अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदार संघातील लोकसभेच्या निवडणुकीसाठी आयोजित केलेल्या महायुतीच्या प्रचाराच्या सांगता सभेत भर पावसात खा.डॉ.सुजय विखे यांनी तुफान फटकेबाजी करत विरोधी उमेदवाराचा चांगलाच समाचार घेतला. जो जनतेला त्रास देईल, गोर गरिबांची पिळवणूक करेल त्याला सोडणार नाही! मागील ४५ दिवसात त्यांनी कुणावरही टिका टिप्पणी न करता पंतप्रधान मोदी आणि आपल्या मार्फत केलेल्या कामांच्या जोरावर मते मागीतली. पण सांगता सभेत त्यांनी घेतलेली आक्रमता ही कार्यकर्त्यांना नवी उर्जा देणारी ठरली.

शनिवारी महायुतीचे उमेदवार खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ श्रीगोंद्यातील शनी चौकात सांगता सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील संबोधित करणार होते. सभेला हजारो लोकांची गर्दी जमली असताना अचानक पावसाने हजेरी लावल्याने ही सभा आटोपती घ्यावी लागली, असे असतानाही डॉ.सुजय विखे यांनी भर पावसात लोकांशी संवाद साधला.

डॉ.विखे पाटील यांनी मागील ४५ दिवस भर उन्हात निष्ठेने प्रचार केला म्हणून सर्वांचे आभार मानले. त्याच बरोबर त्यांनी विरोधी उमेदवारांनी मागील ४५ दिवसात केलेल्या खोटारड्या प्रचाराचा समाचार घेतला. लोकांना शिव्या देणे, अधिकाऱ्यांना धमकावणे, पोलिसांचा बाप काढणे, कार्यकर्त्यांना मारहाण करणे, समाज माध्यमांवरून खोटेनाटे व्हिडीओ टाकून अफवा पसरविणे अशा सगळ्याच गोष्टीवर डॉ.सुजय विखे पाटील यांनी जोरदार टीकास्त्र सोडले. त्यांनी लोकांना आश्वस्त केले की, येणाऱ्या काळात अशा सर्व समाज विघातक प्रवृत्तींना चांगला धडा शिकवला जाईल.

ते म्‍हणाले की, ०४ जूनला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी होणार आहेत, आणि त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याचा विकास हेच आपले एकमेव ध्येय राहणार आहे. नगर मधील विविध प्रश्न आहेत. त्यांची सोडवणूक करायची आहे. माझ्याकडे अद्वितीय अहिल्यानगरचे व्हिजन असून तुम्हाला गर्व वाटेल असा विकास मी करणार असल्याचे त्यांनी सांगितेले यामुळे मतदान करताना देशाचा आणि जिल्ह्याचा विकास कसा होईल हे पाहून मतदान करा असा संदेश त्यांनी दिला.

कुणीही घाबरायचे कारण नाही, कारण महायुती सरकार आपल्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे. जर कुणी दमदाटी, गुंडशाही, दडपशाही करत असेल तर त्याचा कायमचा बंदोबस्त केला जाणार असल्याचे ते शेवटी म्‍हणाले. डॉ.सुजय विखेंच्या जोरदार भाषणाने भर पावसात कार्यकर्त्‍यांचा उत्साह वाढला. अवघे मैदान जय श्रीराम, पंतप्रधान नरेंद्र मोदी, सुजय विखे यांच्‍या घोषणेने दुमदुमून निघाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Ahmednagar News