अहमदनगर Live24 टीम, 24 जुलै 2021 :- प्रेमदान हडकोच्या पश्‍चिमेला लागून असलेल्या दक्षिण-उत्तर रस्त्यावर अनाधिकृत गाळे बांधून सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमण करण्यात आले आहे.

एप्रिल 2019 मध्ये महापालिकेने सदर अतिक्रमण बेकायदेशीर विनापरवाना झाले असल्याचे जाहीर करुन पाडण्याचा हुकूम केला होता. दोन वर्षे उलटून देखील सदरचे अतिक्रमण पाडण्यासाठी कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही.

पिपल्स हेल्पलाईनच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या स्वकार्य भग्याभा आंदोलनातंर्गत मनपा आयुक्तांनी कर्तव्याचे पालन केले नसल्याच्या निषेधार्थ शुक्रवार दि.13 ऑगस्ट रोजी आयुक्तांना वेड्याबाभळीचा काटेरी बुके देऊन अतिक्रमण का काढले नसल्याचा?

जाब विचारला जाणार असल्याची माहिती संघटनेचे निमंत्रक अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली. महापालिका हद्दीतील सावेडी सं.नं. 109 मध्ये मूळ जमीन मालक वसंत धनाजी गायकवाड, मालती वसंत गायकवाड, विनायक वसंत गायकवाड, कमलाकर वसंत गायकवाड,

धनंजय वसंत गायकवाड यांनी लेआऊट प्लॅन मंजूर करून घेतले होते. आणि त्या वेळच्या अमदनगर नगरपरिषदेने ठराव क्रमांक 497 दिनांक 30 जानेवारी 1993 अन्वये लेआऊट प्लॅन मंजूर केलेला आहे.

त्यामध्ये लेआऊट प्लॅन नुसार मंजूर झालेला अंतर्गत नऊ मीटर किंवा सहा मीटर पर्यंत चे सर्व रस्ते मूळ जमीन मालकाने त्या वेळच्या अहमदनगर नगरपरिषदेला 18 ऑक्टोबर 2001 चे नोंदवलेल्या खरेदीखताने दिलेले आहेत.

अशा वेळेस सदरील प्रेमदान हडको पश्‍चिमेकडे सार्वजनिक रस्ता झालेला होता व आहे. परंतु किरण कमलाकर गायकवाड वगैरे तीन लोकांनी या रस्त्याच्या उत्तर बाजूला आणि आणि प्रेमदान ते प्रोफेसर कॉलनी या रस्त्यावर उत्तर बाजूला तीन गाळे बेकायदेशीर रीतीने बांधलेले आहेत.

या संदर्भात पीपल्स हेल्पलाईन संघटनेने 2018 मध्ये तक्रार केली होती. त्यावर अतिक्रमण करणार्‍या लोकांना नोटीस देऊन 1 एप्रिल 2019 च्या महापालिकेच्या आदेशानुसार वरील तीन गाळ्यांचे बांधकाम बेकायदेशीर विनापरवाना आठ मीटर रुंदीच्या रस्त्यावर बांधलेले असे जाहीर करून, पाडण्याचा हुकूम झालेला आहे.

परंतु गेल्या दोन वर्षात महापालिकेने याबाबत काही एक सकारात्मक कारवाई केली नाही. सदर हुकूमाला कोणत्याही कोर्टाने मनाई केली नसताना सुद्धा महापालिकेने आपले कर्तव्य पार पाडले नसल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.

संघटनेच्या वतीने स्वकार्य भग्याभा आंदोलन जारी केले आहे. स्वत:चे विहित कर्तव्य महापालिकेने केले नाही. स्वतःच्या कर्तव्याबद्दल भक्ति, ज्ञान व भान यासंदर्भात महापालिका उदासीन आहे.

महापालिकेचे अधिकारी सार्वजनिक रस्त्यावर झालेले अतिक्रमण हटविण्यास अयशस्वी झाले आहेत. त्यामुळे महापालिकेचा कारभार टंगळमंगळ स्वरूपाचा सुरु असल्याची खात्री सर्वांना पटलेली असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे.

महापालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी या नात्याने 13 ऑगस्ट रोजी आयुक्तांना वेड्याबाभळीचा काटेरी बुके देऊन सदरचे अतिक्रमण तातडीने हटविण्याची मागणी केली जाणार आहे.