Ahmednagar News : राष्ट्रवादी कॉग्रेसचे पदाधिकारी अंकुश चत्तर यांच्यावर पाईपलाईन रोडवरील एकवीरा चौक परिसरात शनिवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास प्राणघातक करण्यात आला होता ते गंभीर झाले होते. उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.
याप्रकरणी भाजपचे नगरसेवक स्वप्निल शिंदे, अभिजित बलाख, सुरज ऊर्फ मिक्या कांबळे, विभ्या कांबळे, महेश कुन्हे, राजु फुलारी आणि अज्ञात सात ते आठ जणांविरुद्ध जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंकुश चत्तर गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज पहाटे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे नगर शहरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
या प्रकरणी सावेडी उपनगरातील भाजपचे नगरसेवक स्वप्नील शिंदे याच्यासह पाच जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.स्वप्नील शिंदे, अभिजित बुलाख, सुरज कांबळे, बिभ्या कांबळे, महेश कुर्हे, राजू फुलारी या मुख्य आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने विदर्भातून ताब्यात घेतले
बाळासाहेब सूर्यवंशी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, एकवीरा चौक परिसरामध्ये लहान मुलांचे भांडण झाले होते. ही भांडणे मिटवण्यासाठी त्यांचा मेव्हणा अंकुश चत्तर यांनी त्यांच्या भाच्याला त्या ठिकाणी पाठवले होते. ही भांडणे मिटवल्यानंतर अंकुश चत्तर यांनी सर्व मुलांना जायला सांगितले. त्यावेळी त्या ठिकाणी राजू फुलारी याने अंकुश चतर यांना बाजूला घेऊन बोलायचे आहे असे सांगून थांबून ठेवले.
त्यानंतर दोन दुचाकीवरुन काही मुले आले व त्यानंतर दोन काळ्या रंगाच्या चारचाकी गाड्या तेथे आल्या आणि त्वातून उतरलेल्या तरुणांनी अंकुश चत्तर यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. तरुणांच्या हातात लोखंडी रॉड, काचेच्या बाटल्या, वायर रोपचे तुकडे, गावठी कट्टा होता. तुला आम्ही जिवंत सोडणार नाही. तू स्वप्निल भाऊच्या नादी लागतोस काय, अशी विचारणा करत मारहाण केली.
त्यावेळी स्वप्निल शिंदे त्या ठिकाणी आला आणि हा संपला का पहा रे, नसेल संपला तर त्याला संपवून टाका असे म्हणाला. तेव्हा तरुणांनी डोक्यात लोखंडी रॉडने पुन्हा मारहाण केली. या मारहाणीमुळे रक्ताच्या थारोळ्यामध्ये अंकुश त्या ठिकाणी पडला होता. त्यानंतर एका खाजगी रुग्णालयामध्ये त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले होते.
या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप हे पदाधिकान्यांसह या ठिकाणी दाखल झाले व त्यांनी या प्रकरणाची सर्व माहिती घेत तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली. तसेच शहर विभागाचे पोलीस उपाधीक्षक अनिल कातकडे हे घटनास्थळी फौजफाट्यासह दाखल झाले या घटनेची माहिती घेतली.
याप्रकरणी सूर्यवंशी यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, नगर शहरामध्ये काही दिवसांपूर्वी ओंकार भागानगरे याची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. या घटनेला एक महिना पूर्ण होत नाही तोच आता ही घटना घडली आहे. त्यामुळे नगर शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.