Ahmednagar Politics : समन्यायी पाणी वाटपाचे पाप विखे-थोरात-पवारांचे, घडलेला इतिहास सांगत माजी आमदारांचा घणाघात

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात पाणीप्रश्न पेटणार अशी चिन्हे दिसू लागली आहेत. दरम्यान यावरून आता माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांवर घणाघात केला आहे. समन्यायी कायदा रद्द करा. तुमच्याकडे आयुष्यभर पाणी भरेल असे आवाहनच मुरकुटे यांनी विखे-थोरात यांना केले आहे.

अशोक कारखान्याच्या गळीत हंगामाचा प्रारंभ नुकताच भानुदास मुरकुटे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या वेळी बीआरएसचे तालुकाध्यक्ष सुरेश गलांडे , गंगापूरचे माजी आमदार आण्णासाहेब माने, भाऊसाहेब कांबळे, कामगार नेते अविनाश आपटे, सचिन गुजर, मंजुश्री मुरकुटे, सुनिता गायकवाड आदी याठिकाणी उपस्थित होते.

यावेळी बोलताना भानुदास मुरकुटे यांनी मोठा घणाघात केला आहे. समन्यायी पाणी वाटप विधेयक २००३ मध्ये तत्कालीन पाटबंधारे राज्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत आणि विधान परिषदेत तत्कालीन राज्यमंत्री बाळासाहेब थोरात यांनी तो मांडला होता.

२००५ मध्ये हा कायदा संमत झाला आणि मधली दोन वर्षे तत्कालीन आमदारांनी त्याला विरोध केला नाही. त्यामुळे समन्यायी पाणी वाटप कायद्याच्या पापाला हे सर्व जण दोषी आहेत, आणि ज्यांनी पाप केले आहे तेच आता हा कायदा रद्द करण्याची मागणी करत आहेत असा घणाघात मुरकुटे यांनी केला आहे.

आम्ही आमदार असतो तर हा कायदा होऊनच दिला नसता. या कायद्यातील तरतुदीनुसार भंडारदरा, निळवंडे येथून जायकवाडीसाठी ३.६ टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे. ती मान्य केली असती तर आजचे संकट उभे राहिले नसते, असे भानुदास मुरकुटे यांनी सांगितले.

भविष्यातील धोका लक्षात घेवून आपण आमदार असताना बिनकालव्याचे निळवंडे होण्याची जी मागणी आपण केली होती ती मान्य झाली असती तर आजचे संकट उद्भवले नसते असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

आपल्या भागासाठी केवळ ९ टीएमसी पाणी भंडारदर्‍यामधून उपलब्ध होणार आहे. यामुळे आता गोदावरी व प्रवरा नदीवरील बंधारे, टाकळीभान व मुठेवाडगाव टेलटँक , बंधारे आदी भरण्यासाठी निळवंडे धरणातील दोन टीएमसी पाणी राखीव ठेवावे, व तसा ठराव गावोगावच्या लोकांनी करावा असे आवाहन माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी ग्रामस्थांना केले.