Bhambavli Waterfalls :- महाराष्ट्राला सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीय परंपरा मोठ्या प्रमाणावर लाभली असून मोठ्या प्रमाणावर ऐतिहासिक परंपरा देखील आहे. यासोबतच निसर्गाने देखील महाराष्ट्राला भरभरून दिले असून अनेक डोंगररांगा, त्या ठिकाणी असलेले गडकिल्ले, पावसाच्या दिवसांमध्ये वाहणाऱ्या नद्या व फेसाळणारे धबधबे इत्यादी निसर्ग सौंदर्याने महाराष्ट्र नटलेला आहे. त्यामुळे भारतातीलच नव्हे तर जगभरातील पर्यटकांची पावले महाराष्ट्राकडे वळतात.
तसेच आपण पश्चिम महाराष्ट्र म्हटले म्हणजे खूप मोठा ऐतिहासिक वारसा या भागाला असून अनेक ठिकाणाचे गडकिल्ले आणि डोंगर रांगांमधील निसर्गसौंदर्य या भागात जास्त करून आहेत. याचा अनुषंगाने जर आपण सातारा जिल्ह्याचा विचार केला तर ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या या जिल्ह्यामध्ये निसर्गाने देखील भरभरून दिलेले आहे.
त्यामुळे पावसाळ्यात या ठिकाणी खुललेले नैसर्गिक सौंदर्य पर्यटकांची पावले आपसूकच या जिल्ह्याकडे वळवण्यासाठी कारणीभूत ठरते. याच सातारा जिल्ह्यातील गर्द वनराई मध्ये असणारा आणि भारतातील सर्वात उंच धबधबा असून त्याचे नाव म्हणजे वजराई किंवा त्यालाच भांबवली धबधबा असे देखील म्हणतात. याच धबधब्याची माहिती आपण या लेखात घेणार आहोत.
वजराई किंवा भांबवली धबधबा
भारतातील सर्वात उंच धबधबा म्हणून ओळखला जाणारा भांबवली धबधबा हा सातारा जिल्ह्यात असून या ठिकाणी पश्चिमेकडे असणारे अनेक धबधबे सध्या पावसाळ्याच्या दिवसात ओसंडून वाहत आहेत. 1840 फूट म्हणजेच 560 मीटर इतका उंच असलेला हा धबधबा भारतातील सर्वात उंच म्हणून ओळखला जातो.
या धबधब्याचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे वरून कोसळणारे पाणी हे तीन टप्प्यांमध्ये वाहत खाली कोसळते. निसर्गाची ही अद्भुत आणि आश्चर्यकारक देणगी पाहण्यासाठी इथे पर्यटकांची खूप गर्दी होते. उमरोडी नदी ही महाराष्ट्रातील या धबधब्याचा पायथा असून तीन पायऱ्या असलेला हा धबधबा बारमाही कोसळतो.
तुम्ही जर या धबधब्याला भेट दिली तर तुम्ही या ठिकाणी सहा मिनिटाच्या अंतरावर असलेल्या कास तलाव देखील पाहू शकतात. या ठिकाणी जर तुम्हाला भेट द्यायची असेल तर जुलै व ऑगस्ट महिन्यातील कालावधी खूप उत्तम समजला जातो. कारण या कालावधीमध्ये या ठिकाणचे वातावरण मनाला प्रसन्न करणारे व खूपच आल्हाददायक असे असते.
या धबधब्यापर्यंत पोहोचण्यासाठी जंगलातून आणि डोंगरांच्या कडे कपारीतून मार्ग काढावा लागतो. या ठिकाणी पर्यटकांनी खूप काळजी घेण्याची गरज असून या ठिकाणी जाण्याची जी काही पायवाट आहे ती निसरडी असल्याने घसरून पडण्याचा देखील मोठा धोका असतो. परंतु अलीकडे शासनाच्या वनविभागाच्या माध्यमातून या ठिकाणी रेलिंगची आणि पायऱ्यांची सोय करण्यात आलेली आहे. या ठिकाणी प्रति व्यक्ती पन्नास रुपये शुल्क आकारले जाते.
या ठिकाणी कसे जाल?
जर तुमची देखील भांबवली धबधबा पहायची इच्छा असेल तर सातारा रेल्वे स्टेशनवर उतरून याठिकाणी तुम्ही कॅब किंवा गाडी भाड्याने करून या ठिकाणी जाऊ शकतात. सातारा रेल्वे स्टेशनवरून धबधब्यावर पोहोचण्यासाठी साधारणपणे सव्वा तास इतका कालावधी लागतो. तसेच तुम्हाला रस्ते मार्गे जायचे असेल तर सातारा याठिकाणी भांबवली 32 किलोमीटर असून सातारा ते कास व कास येथून तांबी पर्यंत जावे लागते व दुसऱ्या मार्गाचा विचार केला तर तो महाबळेश्वर ते तापोळा व तापोळ्यावरन बामनोली ते कास आणि कास ते तांबी अशा मार्गाने जाता येणे शक्य आहे.
भेट देण्यासाठी हा कालावधी आहे योग्य
जर तुम्हाला भांबवली धबधबा पहायचा असेल तर तुम्ही सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत या ठिकाणी जाऊ शकतात.