Farming Business Idea:- शेतीचे स्वरूप आता दिवसेंदिवस बदलत असून शेतकरी आता वेगवेगळ्या पिकांचे उत्पादने घेऊ लागले आहेत. परंपरागत शेतीची पद्धत आणि पिके आता हळूहळू कालाच्या ओघात नाहीसे होऊ लागले असून त्यांच्या जागी वेगवेगळ्या प्रकारचे फळबागा, शेडनेट तसेच हरितगृहांच्या साह्याने संरक्षित शेती प्रकारामध्ये भाजीपाला पिके, ड्रॅगन फ्रुट तसेच स्ट्रॉबेरी व एवढेच नाही तर काही भागांमध्ये आता सफरचंदाचा प्रयोग देखील यशस्वी होऊ लागला आहे.
या पार्श्वभूमीवर बरेच शेतकरी असे असतात की त्यांच्याकडे जमिनीचे क्षेत्र जास्त असते व ते पूर्ण क्षेत्र लागवडीखाली आणत नाही. बरेच क्षेत्र हे पडीक पडलेले असते. अशा शेतकऱ्यांनी जर काही वृक्षांची लागवड केली तर नक्कीच जमिनीचा देखील सदुपयोग करून घेता येईल आणि उत्पन्न देखील लाखात मिळेल. या पार्श्वभूमी जर वृक्ष लागवडीचा विचार केला तर आपल्याला सगळ्यांना माहीत असलेले सर्वात मजबूत आणि महागडे लाकूड म्हणजे सागवान लाकूड होय.
या लाकडाचे भरपूर असे उपयोग असून प्रामुख्याने फर्निचर व प्लायवूड बनवण्यासाठी याचा वापर होतो. इतकेच नाही तर काही औषधे बनवण्यासाठी देखील याचा उपयोग होतो. तसेच या लाकडाची टिकवण क्षमता जर पाहिली तर ती बरीच असल्यामुळे त्याची बाजारपेठेत खूप मागणी असते. त्यामुळे आता भारतामध्ये अनेक शेतकरी सागाची लागवड करू लागले असून अतिशय कमी देखभालीमध्ये सागाचे झाड मोठ्या प्रमाणात वाढते. सागाची लागवड कशी करावी याबाबतचे महत्त्वाची माहिती कृषी अभ्यासक रामेश्वर चांडक यांनी दिलेली आहे ती आपण पाहू.
अशा पद्धतीने करावी सागाची लागवड
त्यांच्या मते सागाची लागवड करणे अगदी सोपी असून याकरता तुम्हाला जास्त प्रमाणात पाण्याचे व्यवस्थापन देखील करण्याची गरज नाही. साग जंगली वृक्ष असल्यामुळे त्याची लागवड केल्यानंतर जास्त देखभाल केले नाही तरी चालते. कमी देखभालीत देखील सागाची वाढ चांगल्या प्रमाणात होते.
साधारणपणे त्यांच्या मते सागाच्या रोपांची लागवड ही आठ ते दहा फुटा अंतरावर करतात. एखाद्या शेतकऱ्याकडे जर एक एकर जमीन असेल या जमिनीमध्ये सुमारे 400 ते 500 एवढे सागाची झाडे लावू शकतो. या झाडाच्या उत्तम वाढीकरिता 15 ते 40° c तापमानाची गरज असते व हे तापमान सागासाठी अनुकूल असते. ज्या क्षेत्रामध्ये सागाची लागवड केली आहे त्या क्षेत्रामध्ये जर ओलावा चांगला राहिला तर सागवानाची वाढ उत्तम होते.
सागाच्या फायदेशीर जाती
जर तुम्हाला देखील सागाची लागवड करायची असेल तर तुम्ही सागाच्या जातींपैकी ऑस्ट्रेलियन साग, भारतीय साग तसेच आफ्रिकन साग, बर्मा साग आणि पांढरा साग म्हणजेच शिवण अशा वेगवेगळ्या लागवड योग्य जातींची निवड करू शकतात. परंतु भारताचा विचार केला तर भारतामध्ये प्रामुख्याने भारतीय साग आणि ऑस्ट्रेलियन सागाची जात प्रसिद्ध आहे.
उदाहरणच घ्यायचे झाले तर तुम्ही भारतीय सागाची लागवड केली तर तो कापणी योग्य होण्याकरिता त्याला पंचवीस ते तीस वर्षाचा कालावधी लागतो. ऑस्ट्रेलियन साग लागवडीपासून 12 ते 14 वर्षांमध्ये तयार होतो. त्यामुळे या जातीची लागवड आर्थिक नफ्याच्या दृष्टिकोनातून फायदेशीर ठरते. या दोन्ही जातींच्या लाकडाचा दर्जा हा उत्तम असतो.
सागाची लागवड अशा पद्धतीने करावी
1- रोप किंवा कलमांची लागवड– महाराष्ट्र तसेच मध्य प्रदेशाचा काही भाग आणि ओरिसा राज्यातील शेतांमध्ये सागाची लागवड करायची असेल तर तिकडेसागांची रोपांची लागवड करतात. या ठिकाणी रानामध्ये सागाची रोपे तयार केले जातात किंवा रोपवाटिकेतून विकत आणली जातात. तीन ते चार महिने वयाची आणि 30 सेंटीमीटर उंच वाढलेली रोपे शेतात लागवडीसाठी योग्य असतात.
2- बियांची लागवड– या पद्धतीने लागवड ही प्रामुख्याने मध्य प्रदेश राज्याच्या काही भागात व उत्तर महाराष्ट्रात प्रामुख्याने केली जाते. या पद्धतीमध्ये शेतात खड्डा केला जातो यामध्ये सागाची बी लावले जाते. या पद्धतीने एका खड्ड्यात दोन किंवा तीन बिया टोकल्या जातात. परंतु या पद्धतीचा तोटा म्हणजे यामध्ये सागाची रोपे बारीक असतात व त्यांची मर होण्याची शक्यता असते व त्यामुळे बऱ्याच ठिकाणी गॅप पडतो.