Gardening Tips:- जेव्हा आपण नवीन घर बांधतो तेव्हा शोभेची किंवा फुलझाडे लावण्याकरिता मोकळा स्पेस सोडत असतो. किंवा घराच्या समोर देखील खूप मोकळी जागा सोडली जाते व यामध्ये आपण अनेक प्रकारची फुलझाडांची तसेच शोभेच्या झाडांची लागवड करतो. बऱ्याच फुलझाडांची लागवड ही कुंड्यांमध्ये केली जाते व घराची शोभा वाढवण्यासाठी या फुल झाडांचा खूप मोठ्या प्रमाणावर उपयोग होत असतो.
घराच्या अवतीभवती आणि घराच्या समोर बागेत असलेल्या फुलझाडांमुळे घराची शोभा आणखीनच उठून दिसते व मन आणि वातावरण देखील प्रसन्न राहण्यास मदत होते. प्रामुख्याने आपण बागेत गुलाब किंवा जास्वंद तसेच चमेली, यासारख्या अनेक फुले झाडांची लागवड करत असतो. याशिवाय बागेतच नाही तर आपण बाल्कनी मध्ये सुद्धा छोट्या कुंड्यांमध्ये अनेक फुलझाडे लावतो.
परंतु ज्याप्रमाणे शेतामध्ये आपण कुठलेही पीक लावल्यानंतर त्यापासून भरघोस उत्पादन मिळावे याकरिता त्याला पाण्याची व खतांची आवश्यकता असते. अगदी त्याच पद्धतीने तुम्ही कुंडीत किंवा घराच्या जवळ असलेल्या जागेत जरी झाडे लावली तरी त्यांना देखील खत व पाणी लागतेच. तेव्हाच ते फुलांनी बहरतात.
परंतु बऱ्याचदा कुंडीत लावलेल्या झाडांना आपण खत आणि पाणी योग्य प्रमाणे देतो परंतु तरी देखील हवे तेवढे फुल त्या झाडांना येत नाहीत. याकरिता मग आपण वेगळ्या प्रकारचे उपाययोजना करायला लागतो परंतु काहीच उपयोग होत नाही. त्यामुळे या लेखात आपण फुलांच्या झाडांची चांगली वाढ व फुले चांगली यावी याकरिता असलेले काही सोपे उपाय या लेखात बघणार आहोत.
कुंड्यातील फुल झाडांना फुले चांगली यावी त्याकरिता असणारे सोपे उपाय
1- कळ्या येतील तेव्हा पाण्याचे नियोजन व्यवस्थित करा– जेव्हा कुंड्यांमध्ये किंवा बागेत लावलेल्या फुलझाडांना कळ्या यायला सुरुवात होते तेव्हा मात्र पाण्याचे नियोजन खूप सांभाळून करणे गरजेचे असते. या स्थितीमध्ये फुलझाडांना जास्त पाणी घालू नये. जास्त पाणी दिले तर फुलांची संपूर्ण ऊर्जा किंवा ताकद ही शाकीय म्हणजेच पानांची वाढ होण्यास होते व फुलांना कमी ऊर्जा मिळाल्यामुळे फुलं चांगले उमलत नाही किंवा फुलं जास्त प्रमाणात येत नाहीत. त्यामुळे गरजेनुसार थोडे थोडे पाण्याची सोय या झाडांसाठी करावी. कारण जमिनीमध्ये थोडाफार ओलावा राहणे खूप गरजेचे असल्यामुळे गरजेनुसार पाण्याचे व्यवस्थापन करावे. परंतु जास्तीचे पाणी देऊ नये.
2- गुलाब आणि जास्वंदाची झाडे उन्हात ठेवावी– उन्हाळा सोडून इतर दिवसांमध्ये हलके ऊन असते तेव्हा त्या उन्हात जास्वंद आणि गुलाब या दोन्ही फुल झाडांना उन्हात ठेवणे गरजेचे आहे. या झाडांच्या योग्य फंक्शन करिता उन्हाची आवश्यकता असल्यामुळे या झाडांना सावलीत ठेवणे योग्य नाही. त्यामुळे जास्त उन्हाची तीव्रता नसेल तेव्हा गुलाब आणि जास्वंद या झाडांना उन्हात ठेवावे.
3- गुलाब आणि जास्वंदाला चांगली फुले येण्याकरिता करा हा सोपा पाच रुपयांचा उपाय– बागेमध्ये किंवा कुंड्यामध्ये जास्त प्रमाणात जास्वंद आणि गुलाबाची लागवड केली जाते. या दोन्ही प्रकारच्या झाडांना चांगली फुले यावी त्याकरिता चहा पावडरचे खत परिणामकारक ठरते. कारण चहाच्या पानांमध्ये पोटॅशियमचे प्रमाण अधिक असते व त्यामुळे फुलांची चांगली वाढ होण्यास व रंग येण्यास देखील मदत होते. याकरिता चहाचे पाणी उकळून चहा पावडर एका जागी साठवून ठेवणे गरजेचे आहे व चहाचे पाणी थंड झाल्यानंतर त्याचा वापर तुम्ही या झाडांकरिता करू शकतात.
तसेच साठवलेली चहा पावडर थंड झाल्यानंतर फर्टीलायझर प्रमाणे तिचा वापर करू शकता. तसेच बऱ्याच घरांमध्ये गोड चहा बनवायची सवय असते व तुमच्या घरात देखील गोड चहा बनत असेल तर अशावेळी उरलेली चहा पावडर तुम्ही पूर्ण धुऊन घ्यावी व दोन ते तीन दिवसांनी झाडांसाठी तिचा वापर करावा.
परंतु एवढे करून देखील जर झाडांना फुलं योग्य प्रमाणात येत नसतील तर झाडाची कुंडी बदलणे महत्त्वाचे असते. झाडाची कुंडी बदलल्यानंतर काही दिवसांनी प्रूनिंग करावी परंतु हार्ड प्रूनिंग करू नये. तसेच 20 ते 25 दिवसाच्या अंतराने झाडांना खत द्यायला विसरू नका.
अशाप्रकारे हा छोटा उपाय केल्याने देखील तुमच्या बागेतील किंवा कुंड्यातील गुलाब आणि जास्वंदाला भरपूर प्रमाणात फुले येण्यास मदत होईल.