Government Decision: बऱ्याचदा आपण ऐकतो की वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामध्ये अनेक व्यक्ती जखमी होतात किंवा त्यांना जीव गमवावा लागतो. बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडण्याच्या बातम्या तर बऱ्याचदा आपण वाचत असतो.अशा घटनांमुळे आणि कुटुंबातील कर्ती व्यक्ती गेल्यामुळे संपूर्ण कुटुंब उघड्यावर पडते.
त्यामुळे आता वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामध्ये जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला किंवा त्याला कायमचे अपंगत्व किंवा गंभीर जखमी झाला किंवा किरकोळ जखमी झाला तर आता अगोदर जी काही शासनाकडून आर्थिक मदत करण्यात येत होती त्यामध्ये आता भरीव अशी वाढ करण्यात आलेली आहे. या संदर्भातील महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असल्याचे निवेदन राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये केले.
काय आहे शासन निर्णयामध्ये?
या संदर्भातला एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय 3 ऑगस्ट 2023 रोजी निर्गमित करण्यात आला असून आता या शासन निर्णयानुसार वन्यप्राण्याच्या हल्ल्यामध्ये जर व्यक्तीला कायम अपंगत्व आले तर अशा व्यक्तीला सात लाख 50 हजार रुपयांची मदत आता दिली जाणार आहे. तसेच अशा हल्ल्यामध्ये जर एखादा व्यक्ती गंभीर जखमी झाला तर त्याला पाच लाख आणि किरकोळ जखमी झाला असेल तर अशा व्यक्तीचा औषध उपचाराचा पूर्ण खर्च हा देण्यात येणार आहे.
तसेच वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामध्ये जर व्यक्तीचा मृत्यू झाला तर संबंधित मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या वारसांना 25 लाख रुपयांच्या आर्थिक मदत करण्यात येण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्यामुळे आता कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच किरकोळ जखमी झालेल्या व्यक्तीला औषधोपचाराचा खर्च देण्यात येणार आहे.
जर एखाद्या व्यक्तीला खाजगी रुग्णालयामध्ये औषध उपचार करणे गरजेचे असेल तर 50 हजार रुपये प्रति व्यक्ती अशा मर्यादेत खर्च दिला जाणार आहे. परंतु शक्य होईल तर औषधोपचार हा शासकीय किंवा जिल्हा रुग्णालयामध्ये करावा असे देखील शासन निर्णयात नमूद करण्यात आले.
अर्थसहाय्य केव्हा देण्यात येते?
वाघ बिबट्या,अस्वल, रान डुक्कर, गवा, लांडगा तसेच तरस, हत्ती, मगर, कोल्हा, नीलगाय आणि माकड यांच्या हल्ल्यात व्यक्तीचा मृत्यू झाल्यास किंवा कायम अपंगत्व, व्यक्ती गंभीर किंवा किरकोळ जखमी अशी वर्गवारी नुसार अर्थसहाय्य या माध्यमातून देण्यात येते.
जर एखादा व्यक्ती किरकोळ किंवा गंभीर जखमी झाला तर त्याला तातडीने योग्य उपचार मिळावेत व ते देखील शासकीय रुग्णालयात मिळावेत यासाठी प्रशासनाकडून पूर्ण प्रयत्न करण्यात येतात व मानवी जीव वाचवण्याला प्राधान्य देण्यात येते. परंतु जर शासकीय रुग्णालय दूर असेल तर अशा वेळेस जखमी व्यक्तीला खाजगी रुग्णालयात जाऊन तातडीचा उपचार करावा लागतो.
कशी देण्यात येईल नुकसान भरपाई?
वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामध्ये मृत व्यक्तीच्या वारसांना जी काही रक्कम देण्यात येईल त्या रकमेपैकी दहा लाख रुपये हे ज्या व्यक्तीला मदत द्यायचे आहे त्याला चेकच्या माध्यमातून तात्काळ देण्यात येईल. तसेच उरलेले दहा लाख रुपये हे पाच वर्षाकरिता मुदत ठेवीमध्ये ठेवावे आणि उरलेले पाच लाख रुपये हे दहा वर्षाकरिता फिक्स डिपॉझिट म्हणजेच मुदत ठेव मध्ये ठेवावे. दहा वर्षे पूर्ण झाल्यानंतर वारसांना पूर्ण रक्कम मिळेल असे देखील महत्त्वाची माहिती वनमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी निवेदनात सांगितली.