कण कण में राम, जन जन में मोदी जी का काम! – खासदार डॉ. सुजय विखे पाटील

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

प्रभू श्री रामचंद्र की जय! भारत भूमीच्या कण कणात ज्या प्रभू श्री रामाचा वास, ध्यास आणि सहवास आहे, त्या मर्यादापुरुषोत्तमाची आस आज प्रत्येक भारतीयाच्या मनात आहे. १४ वर्षांच्या वनवासातून साक्षात प्रभू श्री रामचंद्र आपल्या भेटीसाठी येत असल्याचा परम आनंद आज भारत वर्ष साजरा करीत असल्याचे चित्र आपण पाहतोय आणि सुखावतोही.

पाचशे वर्षांच्या श्रीराम जन्मभूमी मुक्तिसंग्रामाच्या रक्तरंजित संघर्षानंतर स्वप्नपूर्तीच्या स्वर्णीम काळात आपण सर्व श्रीरामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठेचे साक्षीदार होत आहोत, याचा मला मनस्वी आनंद तर आहेच, तितकाच अभिमानही वाटतो आहे. माझ्या पिढीसोबतच आपल्या सर्वांच्या जीवनातील हा एक अविस्मरणीय क्षण आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

आमचे आदरणीय आणि विश्र्वनेते, देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांचा अविरत संघर्ष, निरंतर प्रयंत्न आणि कुशल नेतृत्व यांच्या परिणाम स्वरूप अनेक पिढ्यांचे आणि संपूर्ण विश्वभरातील राम भक्तांचे अनेक शतकांपासून अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण होत आहे.

भारत भूमीतीचा ऐतिहासिक वारसा सांगणारे अयोध्येतील प्रभू श्री रामाचे मंदिर हा समस्त हिंदूंच्या आस्थेचा आणि जिव्हाळ्याचा विषय आहे. पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या अथक प्रयत्नांमुळेच हा ऐतिहासिक क्षण आपण अनुभवणार आहोत. यानिमित्त मा. मोदीजींच्या एका आठवणीस उजाळा द्यावासा वाटतो, ती म्हणजे त्यांनी केलेला एक संकल्प, एक निर्धार!

पंतप्रधान मा. मोदी ३२ वर्षांपूर्वी अयोध्येत दाखल झाले होते. १४ जानेवारी १९९२ हा दिवस मंदिरासाठी महत्वपूर्ण दिवस होता. तेव्हा मोदीजी काश्मीर ते कन्याकुमारी काढण्यात आलेल्या एकता यात्रेत सहभागी झाले होते. या दरम्यान ते अयोध्येतील राम जन्मभूमीत पोहचले. त्यावेळी वेळी त्यांनी एक संकल्प केला.

तंबूत असलेल्या श्रीरामाचे मोदीजींनी दर्शन घेतले आणि “जय श्री राम”च्या घोषणांनी दुमदुमलेल्या वातावरणात राम मंदिर झाल्यानंतरच अयोध्येत परतण्याचा संकल्प केला. आपल्या समर्पण, संघर्ष, त्याग, तपश्चर्या, निर्धार आणि वचनबद्धतेच्या बळावर संकल्पपूर्ती देखील करून दाखवली. १३५ कोटी भारतवासियांसह विश्वातील हिंदूंच्या आकांक्षा व भावनांना पूर्ण करणारे मा. नरेंद्रजी मोदी पहिले पंतप्रधान आहेत.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी १८ जानेवारी रोजी श्री रामजन्मभूमी मंदिराच्या स्मरणार्थ विशेष टपाल तिकीट जारी केले. टपाल तिकिटावर राम मंदिर, चौपाई मंगल भवन अमंगल हरी, सूर्य,शरयू नदी आणि मंदिराच्या आसपासची शिल्प यांचं रेखाटन आहे.

यावेळी श्री रामावर जगभरात जारी करण्यात आलेल्या तिकिटांच्या अल्बमचंही प्रकाशन केले. सर्व जात, धर्म, पंथातले नागरिक राम, सीता आणि रामायणाशी जोडले गेलेले आहेत. सर्व आव्हानांवर मात करुन होणारा प्रेमाचा विजय याची महती रामायण आपल्याला सांगत असल्याचे प्रतिपादन मा. मोदीजींनी केले.

या अनुषंगाने पंतप्रधानांनी देशातील १४० कोटी देशवासियांना २२ जानेवारी रोजी आपापल्या घरात रामज्योती म्हणजेच दिवा लावून दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले आहे. त्याचबरोबर देशभरातील सर्व मंदिरांत स्वच्छता अभियान राबवण्याचे आवाहन देखील मा. मोदीजींनी केले आहे.

मा. मोदीजींच्या या संदेशाचे अनुकरण व त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत अहमदनगर लोकसभा मतदारसंघात स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे. याव्यतिरिक्त माझ्या संकल्पनेतून २२ जानेवारी २०२४ रोजी प्रभू श्री राम प्राणप्रतिष्ठेनिमित्त अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांसाठी विविध उपक्रम व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विजेत्यांच्या कुटुंबातून दोन व्यक्तींना अयोध्येला जाण्याची संधी मिळणार आहे.

जनसामान्यांच्या उत्कर्षासाठी आगामी काळात देखील पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या कुशल नेतृत्वातील केंद्र सरकारच्या जनकल्याणकारी योजना तसेच उपक्रम प्रभावीपणे राबवण्यासाठी सदैव कटिबद्ध राहणार असा संकल्प या शुभप्रसंगी करतो.

राम मंदिराच्या उभारणीसाठी बलिदान देणाऱ्या प्रत्येक रामभक्ताच्या पावन स्मृतीस सादर नमन! प्रभू श्रीरामचंद्रांचे भव्य दिव्य मंदिर उभारून जगभरातील अब्जावधी हिंदूंची स्वप्नपूर्ती केल्याबद्दल पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांचे कोटी कोटी आभार!