Nilwande Dam : काय आहे निळवंडे प्रकल्प ? अहमदनगर जिल्ह्यातील कोणत्या शेतकऱ्यांना काय होणार फायदा ?

Ahmednagarlive24
Published:

Nilwande Dam :- अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील निळवंडे (उर्ध्व प्रवरा प्रकल्प) धरणाचे जलपूजन आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न झाले. उर्ध्व प्रवरा प्रकल्प डावा कालवा हा जिल्ह्यातील दुष्काळी व जिरायत भागाला सुजलाम् सुफलाम् करणारा हा प्रकल्प पथदर्शी ठरणार आहे.

डावा, उजवा, उच्चस्तरीय पाईप कालवा व उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून अकोले, संगमनेर, राहाता, श्रीरामपूर, कोपरगाव व सिन्नर (नाशिक) या तालुक्यातील 182 गावांमधील 67 हजार हेक्टर जमीन ओलीताखाली येणार आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज निळवंडे धरण साईट येथे कोनशिलेचे अनावरण करून जलपूजन करण्यात आले. त्यानंतर डाव्या कालवा मार्गिकेचे कळ दाबून पाणी सोडण्यात आले. यावेळी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल, पशुसंवर्धन, दूग्ध व्यवसाय विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजीमंत्री तथा आमदार चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर आदी उपस्थित होते.

असे आहेत निळवंडे धरणाची प्रमुख वैशिष्टे

● उर्ध्व प्रवरा प्रकल्प (निळवंडे २) हा महाराष्ट्र राज्यातील एक मोठा पाटबंधारे प्रकल्प असून मौजे निळवंडे, ता. अकोले, जि. अहमदनगर येथे प्रवरा नदीवर बांधण्यात आलेला आहे.

● धरण Gravity type Masonary dam असून धरणाची एकूण लांबी ५३३ मीटर व महत्तम उंची ७४.५० मीटर इतकी आहे. धरणाचा सांडवा ओगी प्रकारचा असून त्यावर १२ मीटर x ६.५ मीटर आकाराच्या ५ वक्राकार द्वारांची उभारणी केली आहे. धरणाचा एकुण पाणीसाठा २३६ द.ल.घमी (८.३२ TMC) आहे.

● प्रकल्पाच्या ८५ कि.मी. लांबीच्या डाव्या व ९२.५० कि.मी. लांबीच्या उजव्या कालव्याद्वारे तसेच जलाशयावरील ४ उपसा सिंचन योजना तसेच उच्चस्तरीय पाईप कालव्यांद्वारे एकूण ६८ हजार ८७८ हेक्टर एवढी सिंचन क्षमता प्रस्तावित आहे.

त्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील २४ गावांमधील ४ हजार २३५ हेक्टर, संगमनेर तालुक्यातील ८० गावांमधील २५ हजार 428 हेक्टर, कोपरगाव तालुक्यातील ११ गावांमधील ५ हजार ६६६ हेक्टर, राहाता तालुक्यातील ३७ गावांमधील १७ हजार 231 हेक्टर,

श्रीरामपूर तालुक्यातील ३ गावांमधील ९९९ हेक्टर, राहुरी तालुक्यातील 21 गावांमध्ये ८ हजार ८९ हेक्टर तसेच नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील 6 गावांमधील २ हजार ६१२ हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे. अशा एकूण १८२ दुष्काळी गावांतील ६८ हजार ८७८ हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe