Pune Ring Road: हा आहे पुणे रिंग रोडचा 2007 पासून ते आतापर्यंतचा प्रवास! ए टू झेड वाचा पुणे रिंगरोडची सध्याची स्थिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pune Ring Road :- पुणे रिंगरोड हा पुण्याच्या वाहतूक कोंडी सोडवण्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वपूर्ण असून गेल्या सोळा वर्षापासून पुणे रिंगरोड होणार याबाबतच्या चर्चा आपण ऐकत आलो आहोत. परंतु सध्या परिस्थिती पाहिली तर कुठेतरी हा रिंग रोडचे का मार्गी लागेल अशी शक्यता निर्माण झाली आहे. पुणे रिंगरोडसाठी आवश्यक भूसंपादनाकरिता आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यात आले असून आता भूसंपादनाने वेग देखील घेतला आहे.

पुणे रिंग रोड प्रकल्प हा सुमारे 26 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्तीचा प्रकल्प आहे. जर आपण या पुणे रिंगरोडचा इतिहास पाहिला तर साधारणपणे 2007 मध्ये पुण्याच्या प्रादेशिक विकास आराखड्यामध्ये हा रिंग रोड प्रस्तावित करण्यात आलेला होता. परंतु आजपावेतो सोळा वर्षे पूर्ण होत आली परंतु रिंग रोडचे काम पूर्ण झाले नाही. हा रिंग रोड शिवापुर, पिंपरी चिंचवड, चिंबळी, लोणीकंद, थेऊर आणि शिवापूर असा जोडला जाणार आहे.

त्यातच पीएमआरडीए कडून देखील एक रिंग रोड प्रस्तावित करण्यात आला. यामध्ये एमएसआरडीसी आणि पीएमआरडीए या दोघांचे रिंगरोड बऱ्याच ठिकाणी एकत्र येण्याची शक्यता होती. त्यामुळे कोणता रिंग रोडचे काम होणार याबद्दल बराच गोंधळ उडताना दिसून येत होता.

त्यानंतर 2011 मध्ये त्या वेळीच्या सरकारने एमएसआरडीसीच्या रिंग रोडला मान्यता दिली. त्यानंतर महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आले व अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पामध्ये 26000 कोटी रुपयांचा निधी देऊन याकरिता आवश्यक भूसंपादन करण्याच्या सूचना देखील दिल्या तसेच पश्चिम भागातील रिंग रोडला विशेष महामार्ग क्रमांक एकचा दर्जा देखील देण्यात आला.

 कसे आहे या रिंग रोडचे स्वरुप?

या रिंगरोडची एकूण लांबी 172 किलोमीटर असून तो 110 मीटर रुंद आहे. तसेच हा रिंग रोड सहा लेन म्हणजे सहा पदरी असणार आहे. एमएसआरडीसीच्या माध्यमातून या रिंग रोडचे काम दोन टप्प्यात करण्यात येणार असून यामध्ये पूर्व आणि पश्चिम असे दोन भाग करण्यात आले आहेत. जर आपण या रिंग रोडचे विभाजन पाहिले तर भोरमधील पाच, हवेली तालुक्यातील 11, मुळशी तालुक्यातील 15 आणि मावळ तालुक्यातील सहा गावांचा समावेश असणार आहे.

 पूर्व भागातील रिंग रोड कसा असेल?

पूर्व भागातील रिंग रोडचा विचार केला तर हा हवेली तालुक्यातील भावडी, लोणीकंद, डोंगरगाव, बकारी, वाडे बोल्हाई, शिरसवाडी, मुरकुटे नगर, गावडेवाडीबिवरी, कोरेगाव मूळ, नायगाव, सोरतापवाडी, तरडे आणि आळंदी म्हतोबाची या गावांमधून जाणार आहे. त्यासोबतच पुरंदर तालुक्यातील सोनोरी, दिवे, पवारवाडी,चांभळी, गराडे आणि सोमूर्डी भोर तालुक्यातील कांबरे, नायगाव, केळवडे, साळवडे आणि वरवे या गावातून जाणार आहे.

पूर्व भागातील रिंग रोड हा 66.5 किलोमीटर लांबीचा असून त्याच्यामध्ये चार इनर चेंज असणार आहे तसेच दोन मोठे पुलांचा देखील समावेश आहे. त्यासोबतच 21 लहान पूल, 15 अंडरपास, हलक्या वाहनांकरिता बत्तीस अंडरपास, तीन एलव्हीयुपी अंडरपास, चार ओव्हरपास, दरीत 18 उंच पूल, पाणी वाहून नेणाऱ्या 86 नळ्या हे सगळे पूर्व रिंग रोडसाठी उभारले जाणार आहे. एकूण 695 हेक्टर जमिनीवर उभारला जाणारा हा रिंग रोड तयार करण्याकरिता 6886 कोटी रुपये लागणार आहे.

 पश्चिमेकडचा रिंगरोड त्याचे स्वरुप

पश्चिमेकडचा रिंग रोड हा भोर तालुक्यातील केळवडे, कांजळे,खोपी, कुसगाव तसेच रांजे या गावातून जाणार आहे तर हवेली तालुक्यातील रहाटावडे, कल्याण, घेरा सिंहगड, खामगाव मावळ, मालखेड, वरदाडे, मांडवी बुद्रुक, सांगरूळ आणि बहुली या गावातून जाणार आहे. तसेच मुळशी तालुक्याचा विचार केला तर कातवडी, मुठा, मारणेवाडी, आंबेगाव, उरवडे, कासार आंबोली,भरे, अंबडवेट,घोटावडे, रिहे, पडळकरवाडी, जवळ, केमसेवाडी आणि पिंपळोली व मावळ तालुक्यातील पाचागे,

चांदखेड, बेबड ओहोळ, धामणे, परंदवाडी, जवळ आणि उर्से या गावातून जाणार आहे. जर आपण पश्चिम भागाच्या रिंग रोडचे स्वरूप पाहिले तर यामध्ये सहा इनर चेंज, तीन मोठे पूल, सोळा लहानपूल, मोठ्या वाहनांसाठी वीस अंडरपास, हलक्या वाहनांकरिता सहा अंडरपास, तीन एलव्हीयूपी अंडरपास पूल, छोट्या वाहनांकरिता सात ओव्हरपास आणि दरीतील दोन उंच पूल असा समावेश आहे. पश्चिम भागातील रिंग रोडचा विचार केला तर याकरिता 765 हेक्टर जमिनीची आवश्यकता असून याकरिता 11 हजार 510 कोटी रुपये खर्च येणार आहे.

 पश्चिम भागातील रिंग रोड या महामार्गांना जोडला जाईल

शहरातील प्रमुख भागातून जाणारा हा रिंग रोड प्रमुख सहा महामार्गांना जोडला जाणार आहे. एन एच 48 पुणे ते बंगलोर महामार्ग, एन एच 65 पुणे सोलापूर महामार्ग, पुणे नाशिक महामार्ग, पुणे सासवड पालखी मार्ग, पुणे अहमदनगर महामार्ग या महामार्गांशी हा रिंग रोड कनेक्ट केला जाणार आहे. त्यामुळे सिंहगड रोड, कात्रज तसेच पिंपरी चिंचवड, हडपसर, शिवाजीनगर या ट्रॅफिक जास्त असलेल्या भागातील ट्रॅफिक कमी होण्यास मदत होईल.

 2007 मध्ये प्रस्ताव होऊन काम का पूर्ण झालं नाही?

साधारणपणे या रिंग रोडचा प्रस्ताव 2007 मध्ये आला होता परंतु अजून देखील काम पूर्ण झालेले नाही. यातील सगळ्यात प्रमुख कारण म्हणजे नीधी हे होय. साधारणपणे 2007 मध्ये पुणे जिल्ह्याच्या प्रादेशिक विकास आराखड्यामध्ये हा रिंग रोड प्रस्तावित करण्यात आला होता. परंतु पुरेसा निधी मिळत नसल्यामुळे याचे काम रखडले.

नंतर सत्तेत आलेल्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात 26 ऑगस्ट 2021 ला झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर याकरिता आवश्यक निधी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये देण्यात आला. याकरता निधी उपलब्ध झाल्यानंतर भूसंपादनासाठी मंजुरी देण्यात आली व याकरिता अकरा हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आले. म्हणजेच 2007 ला प्रस्ताव आणि 2021 मध्ये निधी या रिंग रोडच्या उभारणी करता मिळाला. तसेच दुसरा मुद्दा म्हणजे भूसंपादनामध्ये देखील अनेक प्रकारच्या अडचणी आल्या.

सुरुवातीला दोन्ही टप्प्यांच्या भूसंपादनासाठी आवश्यक प्राथमिक सर्वेक्षणाचे काम ताबडतोब पूर्ण करण्यात आले. तसेच जमिनीच्या किमती निश्चित करण्यात आल्या व ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत त्यांना नोटिसी देखील पाठवण्यात आल्या. परंतु याला अनेक शेतकऱ्यांनी आणि स्थानिक रहिवाशांनी विरोध केला. यामध्ये काही ठराविक गावातील घरे आणि बागायती शेती मधील किमतींमध्ये खूप मोठा फरक असल्याचे दिसून आले.

त्यामुळे शेतकऱ्यांनी याकरिता समांतर मोबदला मिळावा व पाठवलेल्या नोटीशीना मुदत वाढवावी अशा पद्धतीच्या मागण्या केल्या. या मागण्यांना मंजुरी मिळाली व पुन्हा शेतकऱ्यांकडून आवश्यक कागदपत्रे आणि मंजूऱ्या मागवण्यात आल्या. त्यामुळे पुन्हा यासाठीची पडताळणी सुरू झाली.

अखेर यावर्षी जून महिन्यात शेतकऱ्यांना पुन्हा यासंबंधीच्या नोटीस पाठवण्यात आल्या व पंधरा दिवसात भूसंपादनाला मान्यता देण्यात आली. आता होऊन जमीन देणाऱ्यांना 25 टक्के अधिकचा मोबदला दिला जाईल असे देखील सांगण्यात आले व ही प्रक्रिया साधारणपणे जून महिन्यात पार पडली. त्यानंतर ऑगस्ट महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या संमतीची पडताळणी करून भूसंपादनाचे काम सुरू करण्यात आले.

 आजपर्यंत हे काम कुठपर्यंत आलेले आहे?

जर आपण काही मिडिया रिपोर्टचा विचार केला तर 85 हेक्टर जागेचे भूसंपादनाचे काम पूर्ण करण्यात आले असून पुढच्या काही दिवसात ज्या शेतकऱ्यांनी परवानगी दिलेल्या आहेत त्यांचे निवाडे जाहीर करून जमीन ताब्यात घेण्याचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. रिंग रोड साठी आतापर्यंत ज्या जमिनींचे संपादन करण्यात आलेले आहे त्यांच्याकरिता 491 कोटी रुपयांचा मोबदला देखील देण्यात आला आहे. एकूण जमीन मालकापैकी 12,166 जमीन मालक जमीन द्यायला तयार झाले आहेत.

पश्चिम भागातील टप्प्यांकरिता 35 गावांमधील 2455 गटातील जमीन खरेदी केली जाणार आहे. त्यापैकी 1775 गटातल्या जमिनीला परवानगी मिळाली आहे. आतापर्यंत 21 दिवसात 491 हेक्टर जमीन रिंग रोडला देण्याची तयारी शेतकऱ्यांनी केली आहे. अजूनही 206 हेक्टर जमीन घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनासमोर आहे. हे भूसंपादनाचे काम सप्टेंबर 2023 पर्यंत संपल्यावर डिसेंबर 2023 मध्ये या रिंगरोडच्या उभारणीचे काम सुरू होणार आहे व ते डिसेंबर 2026 पर्यंत संपेल असे संबंधित अधिकाऱ्यांचा एक अंदाज आहे.