इस्रो ही भारताची महत्त्वाची अशी अंतराळ संशोधन संस्था असून अनेक अवकाश मोहिमांचे आखणी इस्रोच्या माध्यमातून केली जाते हे आपल्याला माहिती आहे. 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान तीनची यशस्वी लँडिंग करून जगाच्या नकाशावर भारताचे नाव कोरले. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत पहिला देश ठरला.
त्यामुळे अख्या जगात भारताच्या इस्रोच्या या ऐतिहासिक कामगिरीचे कौतुक केले जात आहे. या यशस्वी कामगिरी मागे इस्रोच्या शास्त्रज्ञांचे खूप अतुलनीय असे योगदान असून त्यांची कित्येक वर्षाची मेहनत यामध्ये कामाला आली. एवढ्या मोठ्या संशोधन संस्थेमध्ये काम करणाऱ्या शास्त्रज्ञांना किती सॅलरी किंवा किती वेतन असेल याचा नक्कीच प्रश्न आपल्यापैकी बऱ्याच जणांना पडला असेल. याचीच माहिती आपण या लेखात बघणार आहोत.
इस्रोच्या शास्त्रज्ञांना किती असतो पगार?
याबाबत इस्रोचे माजी अध्यक्ष जी. माधवन नायर यांनी माहिती दिली की भारताला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचण्यामागे महत्त्वाची कामगिरी बजावणाऱ्या इस्रोच्या वैज्ञानिकांचा पगार हा इतर विकसित देशांच्या शास्त्रज्ञांच्या तुलनेमध्ये तब्बल पाचपट कमी आहे. तरी देखील शास्त्रज्ञांनी ही ऐतिहासिक कामगिरी केली. त्यांनी म्हटले की आम्ही प्रत्येक मिशन कमीत कमी पैशांमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो व यामागे शास्त्रज्ञांचा कमी पगार हे देखील एक महत्त्वाचे कारण आहे.
तसेच अधिक ची माहिती देताना त्यांनी म्हटले की, इस्रोमध्ये कोणीही पैशासाठी किंवा पैशाच्या लालसेने काम करत नाही. इस्रोमध्ये तुम्हाला एकजण देखील करोडपती सापडणार नाही व प्रत्येक जण साधे जीवन जगतात. या ठिकाणी काम करणाऱ्या कोणाला देखील पैशाचे चिंता नाही कारण प्रत्येकाच्या मनात फक्त देशासाठी योगदान देण्याची महत्वपूर्ण इच्छा आहे.
आम्ही चुकांमधून भरपूर काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करतो व आम्ही आमच्या मिशनमध्ये स्वदेशी वस्तूंचा वापर जास्त प्रमाणात करतो व त्यामुळे आम्हाला मिशनचे बजेट कमीत कमी करण्यामध्ये यश मिळते अशी देखील महत्त्वपूर्ण माहिती त्यांनी दिली.
चांद्रयान तीन मोहिमेला किती आला खर्च?
चंद्रयान तीन या मोहिमेच्या माध्यमातून भारताचे नाव जगाच्या पाठीवर कोरले गेले असून एक नवा इतिहास भारताने रचला. चंद्रयान तीन या मिशनचे एकूण बजेट 615 कोटी रुपये इतके होते. तसे पाहायला गेले तर आजकालच्या अनेक बॉलीवूड आणि हॉलीवुड चित्रपटांचे बजेट इतके असते. इतक्या कमीत कमी बजेटमध्ये देखील भारताने ही दैदीप्यमान कामगिरी करून दाखवली व जगाला चकित केले. त्यामुळे भारत हा चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा जगातील चौथा आणि दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिला देश ठरला आहे.