Success Story : 6 महिन्यांमध्ये पिकवली सव्वा पाच लाखांची शिमला मिरची! असं काय केलं या शेतकऱ्याने, वाचा माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Success Story :- आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अगदी कमीत कमी क्षेत्रामध्ये भरघोस उत्पादन आणि मिळालेला चांगला बाजारभाव यामुळे शेतकरी काही लाखात आर्थिक उत्पन्न मिळवतात. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाला कष्टाची जोड तर हवीच असते व त्यासोबतच व्यवस्थापन हा मुद्दा खूप महत्त्वाचा असतो. तेव्हा या सगळ्या आवश्यक बाबी एकमेकांना जुळून येतात तेव्हा उत्पादनाची गंगा वाहायला लागते व लक्ष्मी देखील भरभरून देते.

आधुनिक तंत्रज्ञानामध्ये आता शेडनेटचा वापर व त्यामध्ये पिकांची लागवड व व्यवस्थापन जवळजवळ बरेच शेतकरी आता करत असून या माध्यमातून कमीत कमी क्षेत्रामध्ये संरक्षित शेती करून खूप मोठ्या प्रमाणावर उत्पादन मिळवता येणे शक्य झाले आहे. त्यातच शासनाच्या अनुदान योजनांचा लाभ देखील शेडनेट उभारणी करता मिळतो.

या अनुषंगाने औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यात असलेल्या हर्षी या गावच्या कृष्णा आगळे या शेतकऱ्याने शासनाच्या योजनेचा लाभ घेतला व शेडनेट उभारून भरघोस असे शिमला मिरचीचे उत्पादन मिळवले. त्यांची यशोगाथा आपण या लेखात पाहणार आहोत.

 एक एकर शिमला मिरची तून सव्वा पाच लाखांचे उत्पन्न

याबाबत सविस्तर वृत्त असे की, औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यात असलेल्या हर्षी या गावचे कृष्णा आगळे यांनी शेडनेटचा वापर करून एक एकर क्षेत्रामध्ये जानेवारी महिन्यात शिमला मिरचीची लागवड केली होती. सध्या त्यांचे मिरचीचे उत्पादन निघत असून ती मिरची ते पुणे किंवा मुंबई या ठिकाणी विक्रीला पाठवतात व आता ते गुजरात राज्यातील सुरत या ठिकाणी देखील विक्रीसाठी शिमला मिरची पाठवत आहेत.

या सगळ्या उत्पादनातून त्यांना साधारणपणे सात महिन्याच्या कालावधीमध्ये सव्वा पाच लाख रुपयांचा नफा मिळाला आहे. परंतु यामागे त्यांचे व्यवस्थापन आणि कष्ट देखील तितकेच कारणीभूत आहेत. जर त्यांची शेती पाहिली तर ती साधारणपणे नऊ एकर इतकी असून  यामध्ये ते मोसंबी आणि ऊस पिकाचे उत्पादन घेतात. तसेच तूर आणि सोयाबीनची लागवड देखील करतात.  नऊ एकर क्षेत्रामधील एक एकर क्षेत्रावर त्यांनी शासनाच्या नानाजी देशमुख कृषी सहाय्य योजनेच्या माध्यमातून 18.15 लाखांचे अनुदान मिळवले आणि स्वतःचा चार लाखांचा खर्च करून शेडनेट उभारले.

म्हणजेच 23 लाख रुपये गुंतवणूक करून शेडनेट उभारले व या शेडनेटमध्ये त्यांनी जानेवारी महिन्यामध्ये शिमला मिरचीची लागवड केली व मार्च महिन्यापासून ही मिरची निघण्यास सुरुवात झाली आहे. या सगळ्या सिमला मिरचीच्या उत्पादनामध्ये त्यांना कुटुंबाची खूप मोलाची साथ लाभली.

महत्वाचे म्हणजे या कामांमध्ये त्यांना त्यांच्या आई-वडिलांनी सुद्धा खूप मदत केल्याचे ते आवर्जून सांगतात. त्यांचे शिक्षण एमए पर्यंत झाले असून ते व त्यांच्या पत्नी जयश्री आगळे हे अत्यंत कष्टाने आणि प्रयोगशीलतेने शेती करतातच परंतु त्यासोबत त्यांनी दोन गुंठ्यामध्ये नर्सरी व्यवसाय देखील सुरू केला आहे. या रोपवाटिका व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी दोन लाख रोपांची विक्री केली असून या माध्यमातून सव्वा सहा लाख रुपयांचा नफा मिळवला आहे.

म्हणजेच एकंदरीत शेतीचे त्यांचे नियोजन पाहिले तर ते विविध अंगी असून काटेकोर असल्यामुळे त्यांनी ही किमया साधली आहे. कृष्णा आगळे यांच्या मते शेडनेटमध्ये जर पीक लागवड केली  तर ते बाहेरील वातावरण असंतुलनापासून पिकांचा बचाव करू शकतात व उत्पन्न चांगले मिळवू शकतात. शेडनेटमध्ये ठिबक तसेच बुरशीनाशकांचा वापर करणे देखील गरजेचे असून त्या पद्धतीने पिकांची काळजी घेतली तर भरघोस उत्पादन मिळते हे कृष्णा आगळे यांच्या उदाहरणावरून दिसून येते.