गाई-म्हशींना हेल्दी ठेवण्यासाठी शेतकऱ्याने केली नको ती गोष्ट! पाहून चक्रावले राज्य उत्पादन शुल्काचे पथक

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पशुपालन व्यवसाय करत असताना गायी व म्हशींना आरोग्याच्या दृष्टिकोनातून आणि दूध उत्पादनाच्या वाढीसाठी शेतकरी बंधू अनेक प्रकारचे उपाय करतात. यामध्ये आहार व्यवस्थापनापासून अनेक बाबींवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे असते. त्यामुळे अनेक बारीक सारीक बाबींचे नियोजन आणि व्यवस्थापन योग्य रीतीने शेतकरी बंधू करतात आणि दुधाचा धंदा किफायतशीर बनवतात. परंतु दुभत्या तसेच गाभण म्हशी आरोग्याच्या दृष्टिकोनातून तंदुरुस्त राहाव्यात याकरिता जालना जिल्ह्यातील राहेरा येथील शेतकऱ्याने नको ती गोष्ट केली आणि राज्य उत्पादन शुल्काच्या जाळ्यात अडकला.

 शेतात केली गांजाची लागवड

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, दुभत्या तसेच गाभण म्हशीना तंदुरुस्त ठेवण्याकरिता त्यांना गांजाचा खुराक घालता यावा याकरिता शेतकऱ्याने पपईच्या शेतामध्ये चक्क गांजांचे लागवड केल्याचे धक्कादायक प्रकार राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने 28 ऑगस्ट म्हणजे सोमवारी जालना जिल्ह्यातील घनसांगवी तालुक्यात असलेला राहेरा या ठिकाणी उघडकीस आणला. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने जालना जिल्ह्यातील घनसांगवी तालुक्यात असलेल्या राहेरा या ठिकाणी असलेल्या शेतामध्ये टाकलेल्या धाडीत दोन लाख रुपये किमतीचे गांजाची झाडे जप्त केले आहेत.

राहेरा येथील शेतकरी दौलत लिंबाजी धांडगे या शेतकऱ्याचा म्हशींच्या खरेदी विक्रीचा व्यवसाय असून व्यवसायामध्ये चांगली वाढ व्हावी याकरिता शेतकऱ्याने केलेला हा जुगाड पाहून राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पथक देखील चक्रावले. या शेतकऱ्याने गांजाची लागवड केली असून तो खुराक म्हणून म्हशीना खाऊ घालत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती व या आधारे त्यांनी छापा टाकला. त्यामध्ये त्यांना पपईच्या शेतामध्ये गांजाची लागवड केल्याचे दिसून आले.

म्हशींना जर गांजाचा खुराक खायला दिला तर ते जास्त प्रमाणात चारा खातात व सुदृढ आणि तंदुरुस्त होतात. अशा तंदुरुस्त  म्हशींच्या विक्रीतून चांगला नफा होत असल्यामुळे धांडगे याने स्वतःच्या शेतातच म्हशींना खुराक देता यावा म्हणून गांजाची लागवड केल्याचे चौकशीअंती दिसून आले. टाकलेल्या या छाप्यामध्ये पपईच्या बागेतील गांजाची झाडे आणि जनावरांच्या गोठ्यावर सुखवत घातलेला 16 किलो गांजा जप्त करण्यात आला असून जवळपास याची किंमत दोन लाख रुपये आहे.

या संपूर्ण प्रकरणी तीर्थपुरी पोलीस ठाण्यामध्ये रात्री उशिरापर्यंत कुठल्याही गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली नव्हती. परंतु सदर शेतकरी गांजा नेमका म्हशीना खायला देत होता की त्याची विक्री करत होता याबाबतचा तपास करण्यात येत असल्याचे उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सांगण्यात आले.