युवा शेतकऱ्याने नवख्या फळाचा प्रयोग इंदापूर तालुक्यात केला यशस्वी! वाचा या अनोख्या फळाची माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान आणि आधुनिक पिकपद्धती मोठ्या प्रमाणावर शेतकरी आता अवलंबून असून परंपरागत शेती पद्धती आणि पिकांची जागा आता आधुनिक पद्धतीने वेगवेगळ्या पिकांनी घेतलेली आहे. जर आपण यामध्ये फळ पिकांचा विचार केला तर ड्रॅगन फ्रुट आणि स्ट्रॉबेरी सारखे पिकांची लागवड तर शेतकरी करत आहेतच परंतु जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेश म्हणजेच एकंदरीत उत्तर भारतात येणारे सफरचंदाची लागवड देखील महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी यशस्वी करून दाखवलेली आहे.

या सगळ्यांमध्ये शेतकऱ्यांची अफाट जिद्द आणि प्रयोगशीलता हे गुण खूप महत्त्वाचे ठरताना दिसून येत आहेत. अगदी याच पद्धतीने जर आपण पॅशन फ्रुट या नवीन फळाचा विचार केला तर हे अनेक आजारांवर उपयुक्त असणारे फळ असून या पिकाचा प्रयोग पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात असलेल्या कचरवाडी या गावचे अमर बरळ या युवा शेतकऱ्याने यशस्वी करून दाखवलेला आहे. विशेष म्हणजे हा या परिसरातील पहिलाच प्रयोग असल्याचे म्हटले जात आहे. या अनुषंगाने आपण या लेखात याबद्दलची महत्त्वाची माहिती घेणार आहोत.

 इंदापूर तालुक्यात पॅशन फ्रुटची लागवड यशस्वी

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, इंदापूर तालुक्यातील कचरवाडी या ठिकाणचे रहिवासी असलेले अमर पांडुरंग बरळ या युवा शेतकऱ्याने पॅशन फ्रुट या नवीनच असलेल्या फळ लागवडीचा प्रयोग यशस्वी करून दाखवलेला आहे. विशेष म्हणजे हे फळ मानवी आरोग्य करता खूपच फायदेशीर आहे. पॅशन फ्रुट लागवडीकरिता या फळाचे बियाणे हे राजस्थान व मध्य प्रदेश सीमेवर असणाऱ्या किसन गड या ठिकाणाहून बिया आणून त्यांनी नैसर्गिक रोपे तयार केली व पाऊण एकर क्षेत्रामध्ये शंभर रोपांची त्यांनी लागवड केली.

लागवड करताना दोन ओळीतील अंतर 10 आणि रोपातील अंतर सात फूट ठेवली व बांबूंचा आधार देऊन पॅशन फ्रुटची लागवड केली. जर आपण या फळाचा विचार केला तर हे एक वेलवर्गीय फळ असून याला कुठल्याही प्रकारच्या कीटकनाशकांची भासत नाही.

त्यांचा विचार केला तर केवळ शेणखताचा वापर करून देखील फळ उत्तम पद्धतीने पिकते. कुठल्याही प्रकारचा कीटकांचा प्रादुर्भाव होत नाही परंतु फळ माशी वर नियंत्रण ठेवणे गरजेचे असते. फळमाशीचे नियंत्रण ठेवण्याकरिता अमर यांनी माशांचे ट्रॅप लावून  फळ माशांचे नियंत्रण केले आहे. पॅशन फ्रुट शंभर टक्के सेंद्रिय पद्धतीने पिकवली जात असून अमर यांच्या शेतातील फळ आता काढणीला आले आहे.

 अशा पद्धतीने आहे विक्रीचे प्लॅनिंग

पॅशन फ्रुट या फळाला मोठ्या शहरांमध्ये खूप मागणी आहे. अगदी सुरुवातीला अमर यांनी या फळाचे विक्रीचे व्यवस्थापन पुणे या ठिकाणी केले होते परंतु आता जास्त प्रमाणात उत्पादन मिळत असल्यामुळे बिग बास्केट, अमेझॉन तसेच रिलायन्स या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरून विक्री करण्याची त्यांची प्लॅनिंग आहे. या प्लॅटफॉर्मवर या फळाचे नमुने दिले जाणार आहेत व याचे दर निश्चित केले जाणार आहेत.

 पॅशन फ्रुट लागवडीतील महत्त्वाची बाब

पॅशन फ्रुट लागवडीकरिता स्टेजिंग करणे गरजेचे असून अमर यांना स्टेजिंगसाठी एकूण तीन लाख रुपये खर्च आला. परंतु एकदा स्टेजिंग केले तर पुढील दहा ते बारा वर्षापर्यंत स्टेजिंगसाठी लागणारा खर्च येत नाही. आता काढणीला आलेल्या पिकातून साडेतीन टन माल निघेल अशी अपेक्षा त्यांना आहे व यातून चार लाख रुपयांचे उत्पन्न मिळण्याचे अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली.

 पॅशन फ्रुटचे आरोग्यदायी गुणधर्म

पॅशन फ्रुट हे मानवी आरोग्यासाठी खूप महत्त्वपूर्ण असून डेंगू आजारावर तसेच पांढऱ्या पेशी नियंत्रण ठेवण्यासाठी सिद्ध होते. शरीराचे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी व हृदयासाठी देखील खूप लाभदायक आहे तसेच विटामिन सी ने युक्त असल्यामुळे शरीराला खूप फायदेशीर आहे.