नितीन देसाईंना कर्ज देणारी एडलवाईज एआरसी कंपनीची पार्श्वभूमी काय? काय काम करते ही कंपनी?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नितीन चंद्रकांत देसाई हे भारतातील एक प्रसिद्ध कला दिग्दर्शक तसेच प्रोडक्शन डिझायनर, चित्रपट व दूरदर्शन निर्माता होते. त्यांचे मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील काम अतिशय उल्लेखनीय असे होते. 1999 मध्ये प्रदर्शित झालेला हम दिल दे चुके सनम, 2001 मध्ये प्रदर्शित झालेला लगान, 2002 मधील देवदास, 2008 यासाठी प्रदर्शित झालेला जोधा अकबर आणि 2015 मध्ये प्रदर्शित झालेला प्रेम रतन धन पायो इत्यादी चित्रपटांच्या माध्यमातून ते खूप प्रसिद्ध झाले होते.

एवढेच नाही तर त्यांना चार वेळा सर्वात्कृष्ट कला दिग्दर्शनाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि तीन वेळा उत्कृष्ट कला दिग्दर्शन पुरस्कार देखील मिळाला. या सगळ्या त्यांच्या करिअरच्या वाटेमध्ये त्यांनी 2005 मध्ये तब्बल 52 एकर क्षेत्रावर कर्जत या ठिकाणी एनडी स्टुडिओ सुरू केला होता. याच स्टुडिओमध्ये जोधा अकबर तसेच ट्रॅफिक सिग्नल सारखे चित्रपटांची निर्मिती देखील करण्यात आली.

परंतु दोन ऑगस्ट 2023 रोजी याच त्यांच्या कर्जत मधिल एनडी स्टुडिओमध्ये नितीन देसाई यांनी गळफास लावून आत्महत्या केली. त्यांच्या मृत्यूची चौकशी सुरू असताना नितीन देसाई यांच्या पत्नी नेहा देसाई यांनी खालापूर पोलीस स्टेशनमध्ये एडलवाईज या कंपनीशी संबंधित असलेल्या पाच जणांविरुद्ध तक्रार दाखल केली व पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला आहे.

नितीन देसाई यांच्या मृत्यू प्रकरणानंतर एडलवाईज एनआरसी या कंपनीचे नाव वारंवार समोर येत असून नेमकी ही कंपनी काय काम करते किंवा या कंपनीचे पार्श्वभूमी काय? हे देखील पाहणे तितकेच गरजेचं आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर या कंपनीने देखील  स्वतःची बाजू मांडण्यासाठीचे एक पत्रक देखील जारी केले आहे.

 एडलवाईज एआरसी कंपनी काय काम करते?

या कंपनीचे एडलवाईज असेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी असे पूर्ण नाव असून ही कंपनी एडलवाईज ग्रुपचा एक भाग आहे. ही कंपनी एक वित्तीय सहाय्य करणारी कंपनी असून ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार आर्थिक सहाय्य देखील करते. ही कंपनी प्रामुख्याने गृह कर्ज आणि व्यवसाय सुरू करण्यासाठी वित्तपुरवठा करते. एवढेच नाही तर म्युच्युअल फंड आणि पर्यायी मालमत्ता यासारख्या मालमत्तांचे व्यवस्थापन, मालमत्तांची पुनर्रचना आणि विमा या क्षेत्रात देखील या कंपनीचे काम आहे.

जर आपण या कंपनीच्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार विचार केला तर एडलवाईज एआरसी बँका आणि वित्तीय संस्थांकडून एनपीए अर्थात नॉन परफॉर्मिंग असेट मिळवून त्यांचे सिक्युरिटायजेशन अँड रीकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट अँड इन्फॉर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट अॅक्ट 2002 मध्ये नमूद केलेल्या नियमानुसार निराकरण करण्याच्या व्यवसायात देखील आहे.

या कंपनीचे हेडकॉटर हे मुंबईतील कलिना या ठिकाणी असून या कंपनीचे एकूण बारा लाख ग्राहक आहेत. 476 ठिकाणी ऑफिस असून 11000 कर्मचारी या कंपनीत कामाला आहेत. एवढेच नाही तर सीडीपीक्यू ही उत्तर अमेरिकेतील सर्वात मोठ्या पेन्शन फंड व्यवस्थापकांपैकी एक असलेल्या कंपनीची गुंतवणूक देखील एडलवाईज कंपनीत आहे. ही सर्व माहिती या कंपनीच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

एडलवाईज हा एक ग्रुप असून त्याचे स्थापना रसेश शाह आणि व्यंकट रामास्वामी यांनी केले आहे. यापैकी रशेश शाह हे या समूहाचे चेअरमन आहेत व त्यांचे नाव संचालकांच्या यादीत देखील आहे. त्यांनी एमबीएचे शिक्षण आयआयएम अहमदाबाद येथून पूर्ण केले असून नवी दिल्लीतल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेड मधून आंतरराष्ट्रीय व्यापार या विषयात डिप्लोमाची पदवी देखील मिळवली आहे. एवढेच नाही तर रसेश शाह हे 2017 ते 18 या दरम्यान भारतातील उद्योग व्यवसायिकांची संघटना असलेल्या फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे अध्यक्ष देखील होते.

 या कंपनीचे नितीन देसाई यांच्यावर होते 180 कोटींचे कर्ज

नितीन देसाई यांचा कर्जत मधील एनडी स्टुडिओ वर एडलवाईज एआरसी या कंपनीचे 180 कोटींचे कर्ज होते व या 180 कोटींचे कर्ज हे 252 कोटी झाले होते. या सगळ्या प्रकारातून आता रशेश शाह ही व्यक्ती आणि कंपनीच्या एकूण कार्यपद्धतीवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून या कंपनीची सर्व पद्धतीने आता चौकशी करण्यात येत आहे.

या कर्ज प्रकरणांमध्ये नितीन देसाई यांना कर्ज वसुलीचा वारंवार तगादा लावून मानसिक त्रास दिला व त्याच मानसिक त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली अशी तक्रार नितीन देसाई यांच्या पत्नी नेहा देसाईंनी केल्याचे रायगड पोलीस अधीक्षक कार्यालयाने काढलेल्या प्रेस नोटमध्ये  देखील म्हटले आहे. आता खानापूर पोलीस ठाण्यामध्ये या कंपनीच्या विरोधात 269/2023,304,34 या भारतीय दंड संहिताच्या कलमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.