जमिनीचे खरेदी विक्रीचे व्यवहार हे आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर होत असतात. जर भारतातील जमीन खरेदी विक्री व्यवहाराचा विचार केला तर हा खूप मोठा व्यवसाय असून या माध्यमातून कोट्यावधीची उलाढाल ही होत असते. बऱ्याच लोकांची मोठमोठ्या शहरांमध्ये किंवा मोक्याच्या जागी जमीन खरेदीची इच्छा असते. बरेच लोक गुंतवणुकी करिता जमीन खरेदी करतात. तसेच पर्यटन स्थळांवर देखील जमीन किंवा घर खरेदीकडे बऱ्याच लोकांचा कल दिसून येतो.
हा झाला विषय पृथ्वीवरील जमीन खरेदी विक्रीचा. परंतु चंद्रावर जर तुम्हाला जमीन विकत घ्यायची असेल तर ते शक्य आहे का? हा देखील एक मोठा प्रश्न आहे. तसेच चंद्रावर जमीन खरेदी करायची तर नेमकी ती विकत घ्यायची कुणाकडून किंवा त्या जमिनीचा मालक कोण हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे. याच अनुषंगाने आपण याबद्दलची महत्त्वाची माहिती घेणार आहोत.
चंद्रावरील जमीन खरेदी व्यवहार सुरू
जर आपण हिमाचल प्रदेश राज्यातील हमीरपुर येथील वकील व्यवसायात असलेल्या अमित शर्मा यांचा विचार केला तर यांनी त्यांच्या मुलीच्या अठराव्या वाढदिवसाच्या निमित्ताने मुलीला भेट म्हणून थेट चंद्रावर जमीन खरेदी केली आहे. या सर्व गोष्टींमध्ये इंटरनॅशनल लूनर लँड रजिस्ट्री आणि लुना सोसायटी इंटरनॅशनल या कंपन्या चंद्रावर जमीन विकण्याचा दावा करत आहेत. आपल्याला माहित आहेच की दिवंगत अभिनेते सुशांत सिंह राजपूत यांनी देखील चंद्रावर जमीन खरेदी केले होती.
याच पद्धतीने जगातील अनेक बडे बिझनेस मॅन यांनी देखील चंद्रावर जमीन खरेदी केली होती.lunarregistry.com या संकेतस्थळाचा विचार केला तर चंद्रावर जर तुम्हाला एक एकर जमीन विकत घ्यायची असेल किंवा ती खरेदी करायची असेल तर त्याकरिता 37.50 डॉलर म्हणजेच भारतीय चलनाचा विचार केला तर 3,075 रुपये इतकी रक्कम तुम्हाला द्यावी लागते
चंद्रावर कोणाचा मालकी हक्क आहे?
ज्याप्रमाणे आपण जमीन खरेदी विक्रीचा व्यवहार करतो तेव्हा संबंधित जमिनीचा कोणीतरी मालक असतो व त्या मालकाकडून आपल्याला जमिनीचा व्यवहार पूर्ण करून ती जमीन खरेदी करता येते. परंतु प्रश्न उरतो तो चंद्रावर जमीन खरेदी करायचा तर नेमकी ती कुणाकडून करायची आणि खरेदी तरी कोणाकडून करून घ्यायची हा होय.
परंतु या संबंधी जर उपलब्ध माहितीचा विचार केला तर आऊटर स्पेस ट्रीटी 1967 नुसार आपल्या अंतराळातील जे काही ग्रह आहेत किंवा चंद्र आहे त्यावर कोणत्याही देशाचा किंवा व्यक्तिगत एखाद्या व्यक्तीचा अधिकार नाही. चंद्रावर कोणताही देश त्याचा ध्वज फडकावू शकतो. म्हणजेच चंद्रावर एखाद्या निश्चित देशाचा किंवा एखाद्या व्यक्तीचा मालकी हक्क नाही.