अनेक व्यवसाय असे असतात की यामध्ये लागणारी गुंतवणूक किंवा भांडवल हे खूप कमीत कमी लागते. परंतु योग्य व्यवस्थापन ठेवून जर असे व्यवसाय केले तर खूप चांगला आर्थिक नफा आपण मिळवू शकतो. काही व्यवसाय सुरू करण्या अगोदर आपल्याला वाटते की हे चालणे अवघड आहे किंवा हा व्यवसाय तग धरू शकणार नाही. परंतु जर व्यवस्थित नियोजन करून जर अशा व्यवसायाची सुरुवात केली तर हे व्यवसाय खूप काही देऊ शकतात.
अशाच पद्धतीने जर आपण नर्सरी व्यवसायाची माहिती घेतली तर हा व्यवसाय खूप चांगला चालणारा व्यवसाय असून या माध्यमातून पैसा देखील उत्तम मिळणे शक्य आहे. कारण सध्याच्या युगामध्ये घरापासून ते अंगणापर्यंत तसेच विविध प्रकारचे कार्यालय, रस्त्याच्या कडेला देखील हिरवळ आणि फुले सजवण्याची एक मोठी क्रेझ सध्या भारतात आहे.
तसेच हॉटेल आणि घरामध्ये देखील सजवण्यासाठी अनेक प्रकारच्या वनस्पतींचा वापर केला जातो. जर या व्यवसायातील मागणीचा विचार केला तर ती खूप जास्त असल्यामुळे तुम्ही या व्यवसायातून प्रत्येक महिन्याला 50 हजार रुपये पेक्षा जास्त कमाई करू शकतात. त्यामुळे आपण या लेखांमध्ये या व्यवसाय विषयी काही महत्वाची माहिती घेऊ.
नर्सरीचे प्रकार
1- रिटेल नर्सरी– यामध्ये घर किंवा कार्यालय इत्यादी करिता झाडांची विक्री केली जाते. त्यामध्ये लहान झाडे, भांडी तसेच प्लास्टिक पॉलिथिन, कंपोस्ट आणि इतर आवश्यक उपकरणे इत्यादी सामानांची विक्री केली जाते. हा व्यवसाय तुम्ही तुमच्या घराच्या आसपास जागा असेल तिथे सुरू करू शकतात किंवा घराच्या टेरेसवर देखील सुरू करू शकतात.
2- होलसेल नर्सरी– या प्रकारालाच व्यावसायिक नर्सरी प्लांट किंवा कमर्शियल नर्सरी प्लांट देखील म्हटले जाते. या प्रकारामध्ये झाडे मोठी केली जातात व त्यांना होलसेल दरामध्ये विकली जातात. तयार केलेले बियाणे आणि झाडे देखील शेतकऱ्यांना शेतीसाठी या माध्यमातून विकतात. त्यामध्ये डाळिंब तसेच शेवगा व कलिंगड इत्यादी रोपे विकली जातात. या प्रकारचे नर्सरी सुरू करण्यासाठी तुम्हाला जास्त भांडवल लागते.
3- लँडस्केप प्लांट नर्सरी– हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुमच्याकडे खूप मोठ्या प्रमाणावर जागेची उपलब्धता असणे गरजेचे असून जागा नसेल तर तुम्ही ती विकत किंवा भाड्याने घेऊ शकता. या प्रकारामध्ये तुम्ही सर्व प्रकारचे झाडे विक्रीला ठेवू शकतात. याकरिता देखील भांडवल मोठ्या प्रमाणावर लागते.
नर्सरी व्यवसाय सुरू करायचा तर लागतील हे घटक
1- जागेची आवश्यकता– व्यवसाय करिता जागेची निवड करताना तुम्हाला लोकांची गरज तसेच बाजार इत्यादी गोष्टींचा विचार करणे गरजेचे आहे. तसेच या व्यवसायामध्ये झाडांची लागवड आणि त्यांचे सुशोभीकरणाकरता जागा लागते. भांड्यांमध्ये जरी रोपे लावले तरी ते भांडे ठेवण्यासाठी तुम्हाला जागा लागते.
2- माती– झाडांची लागवड करण्यासाठी तुम्हाला चांगली आणि पोषक मातीची गरज भासते. माती असल्याशिवाय तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकत नाही. त्यामुळे तुम्हाला हा व्यवसाय सुरू करण्याआधी कोणती माती उपयुक्त व वाळु आणि माती कशा पद्धतीने मिक्स केली जाते इत्यादी माहिती असणे गरजेचे आहे.
3- पाणी– या ठिकाणी तुम्हाला हा व्यवसाय सुरू करायचा आहे त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था असणे खूप गरजेचे आहे.
4- रासायनिक आणि सेंद्रिय खतांची उपलब्धता– त्यामध्ये तुम्हाला कीटकनाशकांविषयी माहिती असणे गरजेचे आहे. तसेच रोपांच्या वाढीसाठी रासायनिक व सेंद्रिय खतांची आवश्यकता असते. तसेच विक्रीसाठी देखील तुम्हाला कीटकनाशक आणि औषधांविषयी माहिती असणे गरजेचे आहे.
5- मशीन आणि उपकरणे– या व्यवसायाकरिता आणि या व्यवसायामध्ये कोणकोणत्या प्रकारचे यंत्रे आणि उपकरणे विकली जातात याची देखील माहिती घेणे गरजेचे आहे त्या पद्धतीने त्यांची विक्री करणे देखील महत्त्वाचे आहे.
6- हिरवी जाळी– यामध्ये आपल्या आसपासचे क्षेत्र कव्हर करण्याकरिता तुम्हाला हिरव्या रंगाच्या जाळीची आवश्यकता भासते.
रोपवाटिके करिता लागणारे रोपे आणि बियाणे कुठून खरेदी करावी?
हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्यासाठी रोपे आणि बियाणे विकत घेणे गरजेचे असते. याकरता तुम्ही सरकारी नर्सरी प्लांट मधून रोपे विकत घेऊ शकतात. यामध्ये तुम्हाला दहा रुपयापासून 2000 पर्यंतचे बियाणे आणि रोपे मिळतील.
हा व्यवसाय सुरू करण्यासाठी किती खर्च येतो?
हा व्यवसाय सुरू करण्याकरिता लागणाऱ्या भांडवलाचा विचार केला तर ते तुमच्यावर अवलंबून आहे. म्हणजेच तुम्हाला हा व्यवसाय सुरू करायचा आहे परंतु तो किती प्रमाणात म्हणजे छोट्या स्तरावर सुरू करायचा आहे की मोठ्या स्तरावर यावर तुमचे भांडवल अवलंबून असते. कमीत कमी म्हटले तरी देखील तुम्हाला पन्नास हजार ते एक लाख रुपयांपर्यंतचा खर्च यामध्ये अपेक्षित आहे. साधारणपणे दोन ते तीन महिन्यांमध्ये तुम्हाला हा पैसा परत या व्यवसायातून मिळू शकतो.
हा व्यवसाय सुरू करण्यासाठी लागणाऱ्या परवानग्या आणि नोंदणी
हा व्यवसाय सुरू करण्याकरिता तुम्हाला महानगरपालिकेची परवानगी घ्यावी लागते.जर महानगरपालिका क्षेत्रात हा व्यवसाय सुरू करत असाल तर. याकरिता तुम्हाला महापालिकेच्या माध्यमातून प्रमाणपत्र देण्यात येते व तेव्हा तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकतात. तसेच तुम्हाला तुमच्या कंपनीचे रजिस्ट्रेशन करावे लागेल व जीएसटी नंबर आणि बँक अकाउंट सुरू करणे गरजेचे आहे. नर्सरी प्लांट उघडण्याकरिता तुम्हाला सरकारची देखील परवानगी घ्यावी लागते. तुमच्या व्यवसायाचा विमा काढणे देखील आवश्यक आहे.
या व्यवसायाचे मार्केटिंग कशी कराल?
नर्सरी व्यवसायाची मार्केटिंग करण्याकरिता तुम्ही सोशल मीडियाचा वापर चांगल्या पद्धतीने करू शकतात. तसेच बॅनर, व्हिजिटिंग कार्ड, टेम्प्लेट तसेच इतर महत्त्वाच्या साधनांचा वापर करून व्यवस्थित मार्केटिंग करून एक चांगला व फायदेशीर व्यवसाय सुरू करू शकतात.