सौर ऊर्जेचा वापर हा येणाऱ्या भविष्यकाळामध्ये अपरिहार्य ठरणार असून याकरिता शासनाच्या माध्यमातून देखील अनेक प्रकारच्या योजनांच्या माध्यमातून प्रोत्साहन दिले जाते. या अनुषंगाने जर आपण घरातील विजेचा वापराचा विचार केला तर विजेचे दर देखील भरमसाठ वाढल्यामुळे वाढीव वीज बिलाचा झटका फार मोठ्या प्रमाणावर ग्राहकांना बसतो.
त्यामुळे विज बिल कमी येण्याच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर सौर ऊर्जेचा वापर हा खूप फायद्याचा ठरणार आहे. याच अनुषंगाने जर आपण कला शाखेत पदवीधर असलेले डुंगरसिंग सोढा यांनी कुठल्याही प्रकारचे प्रशिक्षण न घेता एक पोर्टेबल पवनचक्की विकसित केली असून ती सर्वसामान्य माणसाच्या वीज बिलामध्ये खूप मोठा दिलासा देऊ शकते असा त्यांनी दावा केला आहे.
एका पिशवीत मावेल या आकाराची पवनचक्की ठरेल फायद्याची
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, राजस्थान राज्यातील डुंगरसिंह आणि गुजरात राज्यातील जुनागड जिल्ह्यातील तरुण दिव्यराज सिंह सिसोदिया या दोन तरुणांनी सनविंड नावाचा स्टार्टअप सुरू केला असून या माध्यमातून त्यांनी अतिशय कमी किमतीत ही छोट्या आकाराची पवनचक्की तयार केली आहे. या पवनचक्कीच्या मदतीने तुम्ही घरातील एअर कंडिशनर, टीव्ही आणि फ्रीज सारख्या दैनंदिन गरजेचे उपकरणे आरामात चालवता येतील एवढी वीज निर्माण होऊ शकते असा दावा त्यांनी केला आहे.
अशा प्रयत्नातून अक्षय ऊर्जा स्त्रोतांचा स्वस्त पर्याय उपलब्ध करून देऊन सामान्य माणूस आणि तंत्रज्ञान यांचा मेळ घालण्यात सन विंड सारखे स्टार्टअप खूप महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. आपल्याला माहित आहेच की वाढीव वीज बिलामुळे अनेकदा आपले महिन्याचे बजेट बिघडते. परंतु अशा पवनचक्क्यांचा पर्याय उपलब्ध झाल्यामुळे आपल्या खिशाला परवडेल अशा दरात किंवा विज बिल स्वस्तात आपल्याला उपलब्ध होऊ शकते.
अशा पद्धतीने बनवली ही पवनचक्की
या स्टार्टअप चे संस्थापक डुंगरसिंह सोढा हे राजस्थानचे असून ही पवनचक्की विकसित करण्यामागे असलेल्या हेतू बद्दल ते सांगतात की राजस्थान सारख्या राज्यातून मी आलो व त्या ठिकाणी विज व पाण्याची मोठी समस्या आहे. जर वादळाची समस्या उद्भवली तर अनेक दिवसांपर्यंत वीज येत नाही.
त्यामुळे गावातील शेतकरी आणि शहरी भागातील लोकांची यामुळे खूप मोठी समस्या निर्माण होते व ही समस्या मिटावी याकरिता काहीतरी करावे ही इच्छा मनात होती व त्यातूनच त्यांना पवनचक्कीची कल्पना सुचली असे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे ही कल्पना सत्यात उतरवण्याकरिता त्यांनी पत्रकारितेची नोकरी सोडली व गेल्या दीड वर्षापासून सर्वसामान्य नागरिकांना परवडतील अशा पवनचक्क्यांची रचना आणि निर्मिती करण्यास त्यांनी सुरुवात केली.
आतापर्यंत या कामावर त्यांनी दहा लाख रुपयांपर्यंत खर्च केला आहे. विशेष म्हणजे अशा पद्धतीचे पवनचक्क्या तयार करण्याचे त्यांनी कुठलेही प्रशिक्षण घेतले नाही परंतु सोशल मीडिया तसेच इंटरनेट व पुस्तकांच्या माध्यमातून सर्व काही स्वतःहून ते शिकले असा देखील दावा त्यांनी केला आहे. त्यांनी वेगवेगळ्या मॉडेलची पवन चक्क्या बनवलेल्या असून यामध्ये एक किलो वॅट क्षमतेच्या पवनचक्क्यांचा देखील समावेश आहे.
ही पवनचक्की कसे काम करते?
याबद्दल माहिती देताना ते म्हणतात की ज्या ठिकाणी हवेचा चांगला प्रवाह असतो अशा सर्व ठिकाणी या पवन चक्क्या चांगली वीज निर्माण करू शकतात. आधी तुम्ही घराच्या छतावर देखील ही पवनचक्की लावू शकतात. घरी लावलेल्या पवनचक्कीतून निर्माण होणारी जास्तीची वीज ग्रीडला पाठवली जाऊ शकते. कार्यक्षम उत्पादन तयार करण्यासाठी आम्ही कठोर परिश्रम घेतले व त्यामध्ये वेळोवेळी सुधारणा केल्या असे देखील त्यांनी सांगितले.
या पवनचक्क्यांचे डिझाईन त्यांनी स्वतः तयार केले असून त्याचे काही पार्ट मात्र बाहेरून बनवून आणले आहेत. त्यांनी डिझाईनच्या आधारावर या पवनचक्क्यांचे पार्ट बाहेरून तयार करून घेतले. प्रत्येक पवनचक्कीचे डिझाईन व पार्टवर संशोधन करण्यासाठी अनेक महिने त्यांनी कष्ट घेतले. या पवनचक्कींच्या वीज निर्माण करण्याच्या क्षमतेविषयी बोलताना त्यांनी म्हटलं की एक लहान पवनचक्की पंधरा किमी प्रति तास वाऱ्याच्या वेगाने आणि मोठी पवनचक्की 5 किमी प्रति तास वेगाने वीज निर्माण करते.
या पवनचक्क्यांचे वैशिष्ट्य म्हणजे ह्या केवळ घर, शेत किंवा मोकळ्या मैदानात उपयुक्त नाहीत तर ज्या ठिकाणी पवन ऊर्जा निर्माण करण्याची क्षमता आहे त्या ठिकाणी या उपयोगी असून त्या फोल्ड करता येतात व पोर्टेबल आहे. या पवनचक्की च्या साह्याने मोबाईल फोन चार्ज करता येतो तसेच पंखे देखील चालवता येतात.
तसेच त्यांनी म्हटले कि ही पवनचक्की तुम्ही पिकनिकला तसेच दुर्गम भागात आरामात घेऊन जाऊ शकता व त्या ठिकाणी तुम्हाला वीज लागली तर ती निर्माण करू शकतात. त्यांच्या मते घरच्या घरी बसवता येणारी जी छोटी पवन चक्की आहे तिचा वापर जर केला तर कमीत कमी पाच हजार रुपयांनी विज बिल तुमचे कमी होऊ शकते.