file photo

अहमदनगर Live24 टीम, 12 ऑगस्ट 2021 :- करोनाच्या संकटकाळाचा विचार करून पाणीपट्टी, घरपट्टी माफ करावी, या मागणीसाठी शहरातील अनेक संघटनांनी एकत्र येऊन बुधवारी मनपासमोर धरणे आंदोलन केले.

तसेच महानगरपालिकेने पुनर्मुल्यांकनाच्या नावाखाली घरपट्टीत तीनपटीने वाढविण्याचा प्रस्ताव रद्द करावा अशी मागणी यावेळी उपस्थितांनी केली आहे .

एकीकडे मनपा नागरिकांना मूलभूत सेवा सुविधा देण्यात पूर्णपणे अपयशी ठरले असताना आणि दुसरीकडे गेल्या वर्षापासून जनता कोविडमुळे त्रस्त असताना मनपा कर कमी करण्याऐवजी तीनपटीने वाढवीत आहे.

यामुळे नगरकरांत तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. शहरातील रस्त्यांची वाईट अवस्था, पिण्यासाठी गढूळ पाणी, अस्वच्छतेमुळे शहराचे बिघडणारे आरोग्य,

प्रदूषणात झालेली लक्षणीय वाढ अशा सर्व मूलभूत सोयी नागरिकांना देण्याबाबत मनपा अपयशी ठरली असल्याचा आरोप संघटनांच्यावतीने करण्यात आला.

या आंदोलनात भारतीय कम्युनिस्ट पक्ष, ऑल इंडिया युथ फेडरेशन, पीस फाउंडेशन, गजानन हाउसिंग सोसायटी, भारतीय जनसंसद, कामगार संघटना महासंघ, इकरा सोशल क्लब, आम आदमी पार्टी आदी संघटना सहभागी झाल्या होत्या.