अहमदनगर Live24 टीम, 29 जुलै 2021 :- सध्या जिल्हा स्तर-तीन मध्ये येत असल्याने दुपारी ४ वाजेनंतर सर्व व्यवहार बंद करणे अपेक्षित आहे. आता जिल्ह्यात प्रशासन आणि पोलीस यांच्यामार्फत प्रतिबंधात्मक उपाययोजनांची पायमल्ली कऱणाऱ्यांवर कडक कार्यवाही केली जात आहे.

दरम्यान,आज शेवगाव येथील तालुका प्रशासनानेही एका ठिकाणी लग्न समारंभ सुरु असून नियमांपेक्षा जास्त गर्दी जमल्याची माहिती मिळताच पथकामार्फत तेथे कारवाई केली. संबंधित मंगलकार्यालयाचा मालक आणि वधू-वर आणि त्यांचे आई वडील यांच्यावरही गुन्हा नोंदविण्यात आला.

जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा बुधवारी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी आढावा घेतला होता. त्यावेळी त्यांनी जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना कडकपणे राबविण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आज जिल्ह्याच्या विविध भागात स्थानिक प्रशासनाने मास्क न वापरणे,

सोशल डिस्टंन्सिग न पाळणे याबाबतही अनेक ठिकाणी कारवाई करुन दंड वसूल केला आहे. केवळ दंड नव्हे तर आता वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन आस्थापना कोरोना प्रादुर्भाव संपेपर्यंत बंद करण्याची कारवाई करण्यात येणार आहे.

याशिवाय, लग्न समारंभ, इतर समारंभात सहभागी होऊन परवानगी पेक्षा जास्त गर्दी जमवणारे आयोजक आणि संबंधित ठिकाणच्या जागामालकांवरही कारवाई करण्यात येणार आहे.

संसर्ग रोखायचा असेल तर नागरिकांनी आता स्वताहून नियमांचे पालन करावे. सार्वजनिक ठिकाणी कोविड सुसंगत वर्तणुकीचे पालन कऱणे अपेक्षित आहे. आता सार्वजनिक ठिकाणीही असे नियम न पाळणाऱ्या नागरिकांवरील कारवाई मोठ्या प्रमाणात करण्यात येणार आहे.