file photo

अहमदनगर Live24 टीम, 21 ऑगस्ट 2021 :- केंद्रीय मंत्री नारायण राणे जनआशीर्वाद यात्रेदरम्यान बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर गेल्यानंतर शिवसैनिकांनी स्मारकाचं शुद्धीकरण केलं. या प्रकरणावरुन भाजप-शिवसेनेमध्ये शाब्दिक चकमक उडत आहे.

ज्या लोकांनी हे केलं त्या लोकांना बाळासाहेबांची शिवसेना समजलेली नाही. ही अतिशय संकुचित मानसिकता आहे. मी तर म्हणेन एकप्रकारे बुरसटलेले तालिबानी मानसिकता आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारी ही शिवसैनिकांची कृती नाही, अशी टीका फडणवीसांनी केली.

काल आम्ही सवाल विचारला की, ज्यांनी बाळासाहेबांना जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला त्यांच्या मांडीला मांडी लावून बसतात आणि बाळासाहेबांवर श्रद्धा ठेवून बाळासाहेबांच्या समाधीवर जर कुणी जात असेल तर ती समाधी अपवित्र झाली असे सांगतात.

हे कितपत योग्य आहे? मला असं वाटतं की ही कृती अतिशय अयोग्य आहे, असं फडणवीस म्हणाले. राणेंनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळाला भेट दिली होती. त्यानंतर शिवसैनिकांनी स्मृती स्थळावर गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण केलं होतं.

नारायण राणे यांनी आज या प्रकारावरून शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला. शिवसेना प्रमुखांच्या स्मृती स्थळाची अवस्था आधी पाहा. स्मृती स्थळ दलदलीत आहे. आधी ते पाहा.

मग शुद्धीकरण करा. गोमूत्रं शिंपडून शुद्धीकरण करण्यापेक्षा आधी स्वतचं मन शुद्धीकरण करा, असा हल्ला नारायण राणे यांनी चढवला. राणेंना येऊ देणार नाही असा इशारा शिवसेनेने दिला होता. पण मी पोहोचलो. तिथे कुणीही नव्हते.

उद्धव ठाकरेही नव्हते. मी असतो तर उभा राहिलो असतो, अडवलं असतं. हे काय आहे. पाच सहा जणांना दोनशे दोनशे रूपये देऊन शुद्धीकरणासाठी पाठवलं. तिथे ब्राह्मण हवा होता शुद्धीकरणासाठी आमच्याकडे भरपूर आहे. आम्ही घेऊन गेलो असतो, असा टोलाही त्यांनी लगावला.