Farmer Success Story : महाराष्ट्रातील शेतकरी बांधव कायमच वेगवेगळे प्रयोग करत असतात. विशेष म्हणजे आपल्या नवनवीन प्रयोगाच्या माध्यमातून राज्यातील शेतकरी बांधव आपले तसेच राज्याचे नाव संपूर्ण भारत वर्षात रोशन करत असतात. मराठवाड्यातील एका शेतकऱ्याने देखील शेतीमध्ये बदल करत पुन्हा एकदा शेती शिवाय प्रगती अशक्य असल्याचे अधोरेखित केले आहे.

खरं पाहता शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करत राहणे, तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि उत्कृष्ट नियोजन करणे या काही गोष्टी काटेकोरपणे केल्या तर शेती व्यवसाय हा निश्चितच फायद्याचा व्यवसाय सिद्ध होतो. हेच बीड जिल्ह्यातील एका प्रयोगशील शेतकरी दांपत्याने खरं करून दाखवल आहे.

खाकाळवाडी येथील ईश्वर काशिनाथ शिंगटे व त्यांच्या पत्नी छायाताई ईश्वर शिंगटे या मराठमोळ्या शेतकरी दांपत्यान तज्ञ लोकांचे मार्गदर्शन घेऊन शेतीमध्ये काळाच्या ओघात बदल केला आणि काळ्या आईने या दोघांना भरभरून दान दिले आहे. या कष्टाळू दाम्पत्याने दाखवून दिले आहे की शेती व्यवसायात जर प्रामाणिकपणे आणि खंड न पाडता केले तर निश्चितच यशाला गवसणी घालता येणे शक्य असते.

या शेतकरी दाम्पत्याने तीन हेक्टर क्षेत्रावर पेरू फळबागेची नियोजनबद्ध यशस्वी लागवड करून एका वर्षात जवळपास अडीच ते तीन लाखांचे उत्पन्न घेतले असल्याने सध्या या नवरा बायकोच्या जोडीची तुफान चर्चा परिसरात रंगली आहे. या नवयुवक दाम्पत्याने मोठ्या कष्टाने आणि प्रामाणिकपणाने उत्पादित केलेल्या पेरूची गोडी आता गुजराती देखील चाखत आहेत.

गुजरातमधील सुरत तर महाराष्ट्रातील पुणे, अहमदनगरसारख्या मोठ्या शहरात या दाम्पत्याचा पेरू विक्रीसाठी दाखल होत असून गुजराती लोकांच्या पसंतीस खरा उतरत आहे तर अहमदनगर मधील आणि पुण्यातील मराठमोळी जनता देखील या पेरूच्या चवीने घायाळ झाले आहेत. त्यामुळे या शिंगटे दांपत्याच्या पेरूची बाजारपेठांमध्ये मोठी हवा पाहायला मिळत आहे.

खरं पाहता, शिंगटे दांपत्य अन्नप्रक्रिया उद्योगात गुंतलेले होते. मात्र कोरोनाची झळ या नवयुवक दांपत्याला देखील सहन करावी लागली. मागील दोन वर्षांपूर्वी शिंगटे यांचा अन्नप्रक्रिया करण्याचा उद्योग कोरोनामुळे पुरता अडचणीत सापडला. यामुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न देखील ऐरणीवर आला होता.

मात्र हार के आगे जीत है अन अंधारानंतर दिवस उजाडतोच या उक्तीप्रमाणेच त्यांनी लढण काही थांबवले नाही. कोरोना काळात देखील स्वतःशी, स्वतःच्या विचाराशी लढत आपण सक्सेसफुल व्हायचंच या पॉझिटिव्ह थिंकिंगने आणि तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार त्यांनी शेती व्यवसायात अजून एक प्रयोग करण्याचं ठरवलं. त्यांनी पेरूची फळबाग लावली. यासाठी शासनाच्या पोखरा योजनेचा लाभ घेतला.

पोखरा योजनेत अंतर्गत फळबाग लागवडीसाठी अनुदान दिले जाते या अनुदानाचा लाभ घेतला. त्यांनी नाशिक जिल्ह्यातील येवला येथून तैवान जातीची एक हजार पेरूची रोपे आणून ३ बाय ५ अंतरावर खड्डे खोदून यशस्वी लागवड केली. पाण्याची बचत करण्यासाठी ठिंबक सिंचन प्रणालीचा वापर केला. यामुळे पाण्याची बचत झाली शिवाय विद्राव्य खतांचे व्यवस्थापन करण्यास मदत झाली.

पेरूच्या शेतीतून शिंगटे कुटुंबीयांना अडीच ते तीन लाखांची कमाई होत आहे. व्यतिरिक्त ते पेरूच्या बागेत आंतरपीक म्हणून वेगवेगळ्या पारंपरिक पिकांची लागवड करत आहेत. अर्थातच पारंपारिक पिकातून मिळणारे उत्पन्न अतिरिक्त उत्पन्न म्हणून जमा होत आहे. या पेरू बागेसाठी त्यांना दीड लाखांचा उत्पादन खर्च आला आहे.

निश्चितच खर्च वजा जाता त्यांना लाखो रुपयांची कमाई झाली आहे. यामुळे शिंगटे कुटुंबीयांनी शेतीमध्ये केलेला बदल हा निश्चितच अनुकरणीय असून इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरणार आहे.