Farmer Success Story : मराठवाड्याला कायमच निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करावा लागतो. कधी भीषण दुष्काळ तर कधी जास्तीचा पाऊस यामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांना नानाविध अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र अशा प्रतिकूल परिस्थितीत मराठवाड्यातील शेतकरी बांधव वेगवेगळ्या प्रयोगाच्या माध्यमातून शेती व्यवसायात नेत्रदीपक अशी कामगिरी करतात आणि कायमच चर्चेत राहतात.

संभाजीनगर जिल्ह्याच्या पैठण तालुक्यातील एका प्रयोगशील शेतकऱ्याने देखील प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत शेती व्यवसायात नेत्रदीपक यश संपादित केले आहे. तालुक्यातील मौजे धनगाव येथील संजय कणसे या प्रयोगशील शेतकऱ्याने दीड एकर क्षेत्रात सिताफळ लागवड करून लाखो रुपयांची कमाई करण्याची किमया साधली आहे. विशेष म्हणजे संजय कणसे हे पदवीधर असून देखील शेती व्यवसायाकडे वळले आहेत आणि शेतीतून चांगली कमाई करत आहेत.

खरं पाहता संजय हे एक अल्पभूधारक शेतकरी आहेत. ते देखील इतर शेतकऱ्यांप्रमाणे आत्तापर्यंत पारंपारिक पिकांची शेती करत होते. मात्र पारंपारिक पिकांच्या शेतीत संजय यांना अतिशय कवडीमोल उत्पन्न मिळत होते. यामुळे त्यांनी शेतीत जरा हटके करण्याचा निर्णय घेतला आणि या अनुषंगाने सीताफळ या फळबाग पिकाची शेती करण्यासं त्यांनी सुरुवात केली.

मित्रांनो संजय यांनी दिलेल्या माहितीनुसार 2016 मध्ये त्यांनी सिताफळ बागेची लागवड केली. त्यांनी आपल्या दीड एकर क्षेत्रात सहाशे सीताफळ झाडांची लागवड केली. सिताफळ लागवड केल्यानंतर त्यांना निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करावा लागला. मात्र प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत त्यांनी सिताफळ बाग जिवंत ठेवली आणि आता सीताफळ बागेतून त्यांना चांगले उत्पादन मिळत आहे.

आज एका सिताफळाच्या झाडाला 35 ते 40 किलो सीताफळ लगडले असून त्यांना यातून लाखोंची कमाई होणार आहे. सीताफळ बागेतून संजय कणसे यांना तब्बल 20 टन सीताफळांचे उत्पादन मिळणार असून आत्तापर्यंत 11 टन सीताफळ विकले गेले आहेत. म्हणजेच अजून नऊ ते दहा टन सीताफळ उत्पादित होण्याचा त्यांचा अंदाज आहे.

दरम्यान सीताफळासाठी त्यांना आतापर्यंत 80 ते 90 हजार रुपयांचा खर्च आला आहे. म्हणजे 80 ते 90 हजार रुपयांचा खर्च करून त्यांना जवळपास 12 लाखांपर्यंतची कमाई होणार आहे. साहजिकच संजय कणसे यांनी शेतीमध्ये केलेली हीं कामगिरी इतरांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे. निश्चितच प्रतिकूल परिस्थितीत देखील योग्य नियोजन आखले गेले तर शेती व्यवसायातून चांगली कमाई केली जाऊ शकते हे संजय यांनी दाखवून दिले आहे.