एसटी परिवहन मंडळाचे शासकीय विलानीकरणाच्या मागणीसाठी राज्यात सध्या एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. याचाच फायदा घेत राहुरी तालुक्यातील अवैध प्रवासी वाहतूकदारांनी प्रवाश्याना लुटण्याचा धंदा सुरु केला आहे.

बससेवा बंद असल्यामुळे दामदुप्पट भाडे घेऊन प्रवाशांची आर्थिक लूटमार सुरू झाली आहे. अनेक बेकायदा प्रवासी वाहतूक करणारे वाहनचालक प्रवाशांसह महिलांनाही अरेरावी करीत असल्याच्या घटना समोर येऊ लागल्या आहेत.

या लुटमारीला वाहतूक पोलीस प्रशासनाने आळा घालावा. तसेच लूटमार करणार्‍या वाहनांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी प्रवासी वर्गातून होत आहे. राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे.

यासह अन्य मागण्यांसाठी दि. 7 नोव्हेंबरपासून एसटी कर्मचार्‍यांनी संप पुकारला आहे. राज्यभर पुकारण्यात आलेल्या या संपामध्ये नगर जिल्ह्यातील एसटी कर्मचार्‍यांनी देखील सहभाग नोंदविला आहे.

त्यामुळे लालपरीचे चक्काजाम झाले. दरम्यान लालपरीच्या कर्मचार्‍यांनी पुकारलेल्या संपाचा फटका शिर्डी व शनी शिंगणापूर येथे दर्शनासाठी आलेल्या भक्त प्रवाशांना तसेच इतर प्रवाशांना बसत आहे.

लालपरीच्या चक्काजाम आंदोलनामुळे राहुरी तालुक्यातील खासगी अवैध प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. या काळात प्रवाशांची आर्थिक लूट करण्याचे काम वाहनचालकांकडून होत आहे. वाहतूक प्रशासनाने या वाहन चालकांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.