अहमदनगर Live24 टीम 19 ऑक्टोबर 2021 Ahmednagar News :-  राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना बहुतांश निर्बंध खुले झाले आहेत. त्यामुळे सण-उत्सवांवरील निर्बंधही शिथील होत आहेत. अशा परिस्थितीत यावर्षी दिवाळी उत्साहात साजरी होणार, या आशेवर नागरीक आहेत

मात्र दिवाळी फटक्यांना बंदी घालण्याचा ठराव करून त्याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना नाशिकचे विभागीय आयुक्त डॉ. राधाकृष्ण गमे यांनी सर्व महापालिका आणि जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत.

त्यामुळे नाशिक विभागात म्हणजेच उत्तर महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांपुढे पेच निर्माण झाला आहे. पर्यावरण मंत्रालयाच्या माझी वसुंधरा अभियानाच्या प्रारूप आराखड्याच्या आधारे हा निर्णय घेण्यास सांगण्यात आले आहे.

डॉ. गमे यांनी नाशिक विभागातील नाशिक, नगर, जळगाव, धुळे व नंदुबार जिल्ह्यासाठी या सूचना दिल्या आहेत. प्रदूषण रोखण्यासाठी नाशिक विभागातील सर्व महापालिका आणि जिल्हा प्रशासनाने फटाके विक्री आणि वापर यावर बंदी घालण्याचा ठराव मंजूर करावा.

नियमित सभेत हा ठराव होऊ शकला नाही, तर त्यासाठी विशेष सभा बोलाविण्यात यावी, अशी सूचना करण्यात आली आहे. २२ ऑक्टोबरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करून फटाके बंदीची अधिसूचना काढण्यात यावी, अशा सूचना जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.

सर्व जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त आणि नगरपालिकांच्या मुख्याधिकाऱ्यांना डॉ. गमे यांनी हे पत्र पाठविले आहे. दिवाळीत होणारे ध्वनी आणि हवेचे प्रदूषण रोखण्यासाठी फटाक्यावर बंदी आणण्याचा ठराव महासभेत करण्यात यावा, त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना जारी कराव्यात, असे पत्रात म्हटले आहे.