Gold rate today :- सणासुदीचा हंगाम संपलेला असला तरीही साेन्यातील तेजी कायम आहे. शुद्ध साेन्याचा (२४ कॅरेट) भाव १५५ दिवसांनंतर ४९,००० रुपयांच्या वर गेला अाहे. सोन्याच्या दागिन्यांच्या किमती (२२ कॅरेट) १६१ दिवसांनंतर ४५,००० रुपयांवर गेल्या आहेत.

चांदीचा भावही ९५ दिवसांनंतर ६६ हजार रुपयांच्या वर गेला आहे. विश्लेषकांच्या मते, या वर्षाच्या अखेरीस सोने ५१ हजार रुपये आणि चांदीचा भाव ७० हजार रुपयांपर्यंत जाऊ शकताे.

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असाेसिएशनच्या (अायबीजेए) मते, गुरुवारी प्रति १० ग्रॅम शुद्ध साेन्याची किंमत ९८० रुपयांनी वाढून ४९,३५१ रुपयांवर गेली. त्याअाधी ८ जून राेजी साेन्याची किंमत ४९,०३१ रुपये हाेती.

साेन्याचे दागिनेही ८९८ रुपयांनी महाग हाेऊन ४५,२०६ रुपये प्रति १० ग्रॅम झाले. त्याअाधी २ जून राेजी ही किंमत ४५,०८४ रुपये हाेती. त्याचप्रमाणे चांदीही २,०३८ रुपयांची उसळी मारत प्रतिकिलाे ६६,५९४ रुपयांवर गेली अाहे. याअाधी ६ अाॅगस्टला चांदीचा भाव ६६,७२७ रुपये हाेता.

खरे तर, जगभरातील गुंतवणूकदार आणि विश्लेषकांचा असा विश्वास आहे की सर्व प्रमुख देशांच्या मध्यवर्ती बँका नजीकच्या काळात व्याजदर वाढवणार नाहीत. अशा परिस्थितीत डॉलर आणि रुपयासह सर्व प्रमुख चलने कमजोर राहतील, त्यामुळे सोन्याला आधार मिळेल.

साेने बाजारात तेजी येण्याची चार प्रमुख कारणे
1. अमेरिकेत १९९० नंतरची महागाईची सर्वात वाईट आकडेवारी जाहीर झाली अाहे. महागाई वाढल्याने सोन्याची मागणी आणि किंमत दोन्ही वाढतात.
2. भारतात सणासुदीनंतर लग्नसमारंभासाठी सोन्या-चांदीला जोरदार मागणी अाहे. चीनमध्येही खरेदी वाढली आहे.
3. गेल्या एक वर्षापासून डॉलरमध्ये मोठ्या प्रमाणावर कमजोरी दिसून येत आहे. कमकुवत डॉलरमुळे सोन्याची किंमत वाढते.
4. चीन, रशिया आणि जर्मनीमध्ये कोविड संसर्गाच्या वाढत्या प्रकरणांमुळे जागतिक अर्थव्यवस्थेत मंदीची भीती सोन्याला आधार देत आहे.