अहमदनगर Live24 टीम, 28 जुलै 2021 :- स्वतःच्या लोकप्रियतेसाठी माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे हे स्वतः च्या कांगोणी येथील नातेवाईक व सोयऱ्याधाऱ्यांना पुढे करत कांगोणी गावठाण व कांगोणी फाटा येथे फ्लेक्स बोर्ड लावून श्रीफळ वाढवून हे काम मुरकुटे यांनीच मंजूर केले या आशयाची फ्लेक्सबाजी केली व नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप कांगोणी येथील युवक कार्यकर्ते सोमनाथ कराळे व कांगोणी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केला आहे.

कांगोणी फाटा ते कांगोणी या रस्त्यासाठी मंत्री शंकरराव गडाख यांनी लक्ष घालून निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळे प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली आहे. कांगोणी ते कांगोणी फाटा या रस्ता कामावरून माजी आमदार बाळासाहेब मुरकुटेंनी फ्लेक्सबाजी केली. यावरून कराळे व कांगोणी ग्रामस्थांनी निवेदन काढले.

त्यात म्हटले आहे की, माजी आमदार मुरकुटे म्हणतात की हे काम सन २०१९ मध्ये त्यांनी मंजूर केले. तर गल्ली पासून दिल्ली पर्यत तुमच्या पक्षाची सत्ता असतांना रस्त्याच्या कामास २०१९ मध्येच सुरुवात का झाली नाही. कांगोणी ते कांगोणी फाटा या रस्त्याची लोकांना पायी चालणे कठीण होईल.

इतकी दुरावस्था झालेली असतांना तुम्ही काम का केले नाही, संबंधित ठेकदारावर कारवाई का केली नाही ,काम सुरू करण्यास २ वर्षे का लावले. या रस्ता कामास निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी मंत्री गडाख यांच्याकडे कांगोणी ग्रामस्थांनी केली होती.

त्यानुसार मंत्री गडाख यांनी रस्त्यास निधी उपलब्ध करून दिला. कांगोणी ते कांगोणी फाटा रस्ता काम पूर्ण झाल्यानंतर या कामाचे मंत्री गडाख यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येणार आहे, अशी माहिती कराळे व कांगोणी ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे दिली.