file photo

अहमदनगर Live24 टीम, 26 जुलै 2021 :- नगर जिल्ह्यात सर्वदूर तसेच धरण परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. पाऊस कोसळत असल्याने या सर्व धरणांमध्ये या हंगामातील नवीन पाण्याची विक्रमी आवक झाली आहे. यातच एक दिलासादायक माहिती समोर आली आहे.

जिल्ह्यातील भावली धरण 100 टक्के भरले आहे. भावली या धरणाच्या सांडव्यावरून 73 क्युसेकने विसर्ग सुरू होता. हे पाणी दारणात दाखल होत आहे. दारणाच्या जलाशयात जवळपास 80 टक्कयांपर्यंत वाढ होत आहे.

ब्रिटिशकालीन या धरणातून 1हजार 241 तर जलविद्युत प्रकल्पग्रहातून 550 असा एकूण 1 हजार 791 क्युसेकने विसर्ग सुरू झाला आहे. भावली धरण मागील वर्षाच्या तुलनेत यंदा लवकर भरले आहे. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील घाटमाथ्यावर पावसाने मागील आठवड्यात जोरदार हजेरी लावल्याने या धरणात घाटमाथ्यावरील धबधबे सुरु आहेत.

त्यामुळे या धरणात पाण्याची आवक होत आहे. हे धरण काल रात्रीतून भरले. या धरणाला सांडवा आहे. धरण पूर्ण क्षमतेचे भरल्यानंतर पाणी सांडव्यावरुन पडण्यास सुरुवात होते. 1434 दलघफू क्षमतेचे धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे.

त्यामुळे पाण्याचा विसर्ग दारणात दाखल होतो. दारणा धरणातून विद्युत प्रकल्पाच्या गेट मधून 670 क्युसेकने विसर्ग सोडला जात आहे. गंगापूरच्या पाणलोटातही पावसाचे कधी दमदार तर कधी मध्यम आगमन सुरुच आहे. रविवारी सकाळी 6 वाजता या धरणाच्या पाणलोटातील त्रंबक येथे 72 मिमी पावसाची नोंद झाली.

अंबोली येथे 58 मिमी तर गंगापूरच्या भिंतीजवळ 35 मिमी पावसाची नोंद झाली. 24 तासांत गंगापूर मध्ये 144 दलघफू नवीन पाणी दाखल झाले.