अहमदनगर Live24 टीम, 14 ऑक्टोबर 2021 :- काही दिवसापूर्वी भाजपा नेते किरीट किरीट सोमय्या यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते. या आरोपानंतर हसन मुश्रीफ हे जिल्ह्यात केवळ एका शासकीय कार्यक्रमासाठी आले होते.

तसेच त्यांनी नगर जिल्ह्यातील आपला दौरा रद्द केला होता. याशिवाय नगर जिल्ह्याच्या काही भागात अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. त्याभागात ही हसन मुश्रीफ यांनी अद्याप भेट दिली नाही. या पार्श्वभूमीवर बोलताना आज खासदार विखे यांनी मुश्रीफ यांच्यावर तोफ डागली.

पालकमंत्री सध्या त्यांचे बॅलन्स शीट चेक करत आहेत. ते त्यांचे अकाउंट बुक पाहत आहेत. नेमके किती पैसे आले आणि किती पैसे गेले याचा ते शोध घेत आहेत. ते एकदा सापडल्यानंतर पालकमंत्री आपल्या जिल्ह्यात येथील अशी टीका खासदार सुजय विखे यांनी केली आहे.

ते म्हणाले, ‘मुश्रीफ यांना त्यांचे बॅलन्स शीट पाहू द्या. अकाउंट बुक चेक करू द्या. नेमके किती पैसे आले, किती गेले हे एकदा कळू द्या. त्यानंतरच ते नगर जिल्ह्यात येतील,’ टोलाही त्यांनी लगावला.

दरम्यान, नगर जिल्ह्यातील अतिवृष्टी झालेल्या भागातील शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून तातडीची आर्थिक मदत मिळावी, या मागणीसाठी अहमदनगर जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

या उपोषणामध्ये खासदार डॉ. सुजय विखे यांच्यासह भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माजी मंत्री प्रा. राम शिंदे, आमदार मोनिका राजळे, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, भाजपा जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, प्रदेश कार्यकारणी सदस्य प्रा. भानुदास बेरड आदी सहभागी झाले होते.