अहमदनगर Live24 टीम, 10 ऑगस्ट 2021 :- देशाची राजधानी दिल्ली येथील नागल या भागातील ९ वर्षीय दलित बालिकेस काही नराधमांनी अतिप्रसंग करुन तिची हत्या केली. याविरोधात श्रीगोंदे शहरामध्ये निषेध करुन काँग्रेसने आंदोलन केले व सदर घटनेचा निषेध नोंदवला.

यावेळी जिल्हा बँकेच्या संचालिका अनुराधा नागवडे म्हणाल्या,दिल्ली येथे झालेला प्रकार हा दलित समाजावर मोठा आघात आहे. दलितांवर वारंवार अन्याय, अत्याचार होत आहे. हि बाब शासन व समाजाच्यादृष्टीने लज्जास्पद आहे, तरी सरकारने या नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी, अशी आमची मागणी आहे.

युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्मितल वाबळे म्हणाले, देशातील विविध राज्यात वारंवार काही समाजविकृत लोकांकडून अशा घटना घडत असतात. भारतीय संस्कृतीत स्त्रीला दैवत मानले आहे. त्यामुळे स्त्रीयांचा सन्मान करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. आपल्यासमोर स्त्रीवर अन्याय होत असल्यास त्यास विरोध केलाच पाहिजे.

अशा विकृत लोकांना फाशी शिवाय जरब बसणार नाही.काँग्रेस पक्ष या घटनेचा निषेध करुन आरोपींना कडक शासन व्हावे, अशी मागणी करत असल्याचे सांगितले.

याप्रसंगी नगराध्यक्षा शुभांगी पोटे,श्रीगोंदा तालुका काँग्रेस अध्यक्ष दिपक पाटील भोसले ,नगरसेवक संतोष कोथंबिरे,प्रशांत गोरे,जिल्हा सरचिटणीस राहुल साळवे, विद्यार्थी संघटनेचे शहराध्यक्ष धीरकुमार खेतमाळीस व आदी मान्यवर उपस्थित होते.