एखाद्या संसर्गजन्य आजाराची साथ एकंदरीत सामाजिक जीवनावर कसा परिणाम करू शकते याचा अनुभव कोरोनाने अख्ख्या जगाला दिला. याचे परिणाम सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीवर मोठ्या प्रमाणावर आपल्याला पाहायला मिळाले होते.
कुठल्याही संसर्गजन्य आजाराची साथ पसरल्यावर खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान होते हे कोरोनाच्या आधी सुद्धा अनेकदा जगाने अनुभवलेले आहे.
अगदी याच पद्धतीने आता कोरोना नंतर जगाला आणखी एका साथीच्या आजाराचा किंवा संसर्गजन्य आजाराला तोंड द्यायला लागण्याची शक्यता असून जागतिक तज्ञांना आता बर्ड फ्लूची भीती वाटत आहे. तज्ञांच्या मते बर्ड फ्लू हा आजार कोरोनापेक्षा जास्त नुकसानदायक ठरू शकतो.
बर्ड फ्लू म्हणजे नेमके काय?
बर्ड फ्लू ला एव्हियन इन्फ्ल्यूंझा असे देखील म्हटले जाते. हा एक संसर्गजन्य आजार असून यामुळे प्रामुख्याने कोंबड्या तसे इतर जंगली किंवा घरगुती पक्षी प्रभावित होतात. हा विषाणू खूपच धोकादायक समजला जातो.
यामुळे मनुष्य किंवा पक्षी यांचा मृत्यू देखील होण्याची शक्यता असते. हा एक संसर्गजन्य विषाणूजन्य रोग असून जर एखादा माणुस किंवा पक्षी जर बर्ड फ्लूच्या विषाणूच्या संपर्कामध्ये आला तर त्याला या आजाराचा संसर्ग होण्याची शक्यता असते.
काय असतात बर्ड फ्लूची लक्षणे?
बर्ड फ्लूची लक्षणे पाहिली तर यामध्ये स्नायू आणि सांधेदुखी, ताप येणे, डोकेदुखी, कफ होणे, ओटीपोटामध्ये वेदना जाणवणे, डोळ्यांचा लालसरपणा, अतिसार होणे, मळमळ किंवा उलट्या होतील अशी भावना निर्माण होणे व घशात सूज येणे इत्यादी लक्षणे दिसून येतात.
बर्ड फ्लू कोणत्या कारणांमुळे पसरतो?
1- एखाद्या कोंबडी किंवा पक्षांमध्ये संसर्ग झालेला असेल तर अशा पक्षांच्या संपर्कात आल्यामुळे
2- संसर्ग झालेल्या पक्षांचे मांस प्रामुख्याने कच्चे मांस सेवन केल्याने
3- ज्या ठिकाणी असे संक्रमित पक्षी आहेत अशा ठिकाणी स्वच्छतेचे काम करताना देखील संसर्ग होऊ शकतो.
4- एखाद्या पोल्ट्रीमध्ये काम करत असताना एखाद्या कोंबडीला संक्रमण झाले असेल व तिने जर व्यक्तीला ओरखडा घातला तरी संसर्ग होऊ शकतो.
5- ज्या ठिकाणी असे संक्रमित पक्षी आहेत अशा वातावरणामध्ये श्वास घेण्याच्या माध्यमातून संसर्ग होऊ शकतो.
6- पोल्ट्रीमध्ये काम करणाऱ्या लोकांना मोठ्या प्रमाणावर धोका संभवतो.
कसा कराल स्वतःचा बचाव?
1- सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मृत झालेल्या पक्षांच्या संपर्कात येणे टाळावे.
2- बर्ड फ्लूचा संसर्ग काही भागांमध्ये आला असेल व तुम्ही त्या ठिकाणी राहत असाल तर मांसाहार टाळावा.
3- ज्या ठिकाणहून तुम्ही नॉनव्हेज विकत घ्याल त्या ठिकाणी स्वच्छता आहे की नाही याकडे लक्ष द्यावे.
4- अशा परिस्थितीत मास्क घालून बाहेर जाणे हितावह ठरते.
5- सकस आणि संतुलित आहार घ्यावा.
6- पाणी भरपूर प्रमाणात प्यावे.