आजकाल विविध खाद्यपदार्थांमध्ये केली जाणारी भेसळ ही एक मोठी समस्या असून विविध खाद्यपदार्थांमध्ये भेसळीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. असे भेसळयुक्त खाद्यपदार्थ खाल्ल्यामुळे आरोग्याला नुकसान होऊ शकते.खाद्यपदार्थातील भेसळीमध्ये दुधात केली जाणारी भेसळ ही खूप मोठी समस्या असून यामध्ये अनेक घटकांची भेसळ केली जाते.
आपल्याला माहित असेल की दुधामध्ये डिटर्जंट,साखर, युरिया तसेच मीठ आणि फॉरमेलीन इत्यादी रसायने मिक्स करून दुधाची विक्री केली जाते. अशा पदार्थांची दुधामध्ये भेसळ केल्यावर देखील आपल्याला काहीच कळत नाही. त्यामुळे आपण नकळतपणे अशा प्रकारचे दूध सेवन करत असतो.
पण यामुळे अनेकदा गंभीर आजारांना देखील तोंड द्यावे लागू शकते. त्यामुळे दुधातील भेसळ आपल्याला ओळखता येणे खूप गरजेचे आहे व याकरिता फूड सेफ्टी अँड स्टॅंडर्ड अथॉरिटी ऑफ इंडियाने घरी येणाऱ्या दुधामध्ये युरियाची भेसळ केली आहे का हे कसे तपासावे यासाठी एक टेस्ट सांगितले असून ती आपण पाहणार आहोत.
दुधात केली जाते युरियाची भेसळ
दुध हे प्रोटीन तसेच कॅल्शियम, विटामिन डी आणि ए चा समृद्ध स्त्रोत आहे व त्यामुळे दूध दररोज पिल्यामुळे हृदयविकार तसेच उच्च रक्तदाब आणि टाईप दोन मधुमेह होण्याची शक्यता फारच कमी होते. तसेच दुधामध्ये कॅल्शियम असल्यामुळे हाडांचे आरोग्य देखील सुधारते.
परंतु दुधामध्ये जर युरिया सारखा पदार्थ किंवा रसायन मिसळले तर दुधाची पोषण शक्ती कमी होते. यूरिया हे एक कार्बनिक संयुग असून ते पांढऱ्या रंगाचे असते. याचा वापर पिकांसाठी केला जातो हे आपल्याला माहिती आहे. जर युरिया दुधामध्ये मिसळला तर दुधाचा रंग बदलत नाही व दुधात युरिया मिक्स केल्यामुळे दूध घट्ट होते.
दुधातील फॅट वाढावा याकरता देखील युरिया मिक्स केला जातो. तसे पाहायला गेले तर दुधामध्ये युरियाची केलेली भेसळ ओळखता येत नाही. कारण युरिया दुधामध्ये पूर्ण विरघळतो आणि त्यामुळे दुधाच्या रंगात कुठलाही बदल होत नाही.
परंतु असे युरिया मिश्रित दूध जर आपण वारंवार पिले तर ते आतड्यांसाठी घातक आहे व पचनसंस्थेला देखील नुकसान पोहोचू शकते. असे दूध प्यायल्यामुळे किडनीचे आजार तसेच हृदयाशी संबंधित आजार, दृष्टी कमी होणे आणि कॅन्सरचा धोका देखील वाढतो.
दुधातील युरियाची भेसळ कशी ओळखावी?
1- याकरिता एका टेस्ट ट्यूबमध्ये एक चमचा दूध घ्यावे.
2- त्यामध्ये अर्धा चमचा सोयाबीन किंवा तूर डाळीचे पीठ टाकावे.
3- हे संपूर्ण मिश्रण चांगले मिसळून घ्यावे.
4- त्यानंतर पाच मिनिटात टेस्ट ट्यूबमध्ये लाल लिटमस पेपर टाकावा.
5- त्यानंतर अर्धा मिनिटानंतर तो पेपर बाहेर काढावा.
6- लाल लिटमस पेपरचा रंग बदलला आणि तो निळा झाला तर समजून घ्या की दुधामध्ये युरिया मिसळला आहे.
या व्यतिरिक्त दुधामध्ये मेलामाईन,फार्मलिन, डिटर्जंट, स्टार्च आणि हायड्रोजन पेरॉक्साइड देखील मिसळले जाऊ शकते.