अहमदनगर Live24 टीम, 2 ऑगस्ट 2021 :- आजच्या या घडीला महाराष्ट्रातील महाड, रायगड, चिपळूण, कोल्हापूर, सांगली आदी भागात आलेल्या महापुरामुळे तेथील आपले बांधव संकटात असून त्यांना या संकटाच्या वेळी आपण मदत करणे गरजेचे आहे.

कारण संकटाच्या काळात जो मदत करतो तोच खरा राष्ट्रप्रेमी, समाजप्रेमी आहे असे प्रतिपादन आदर्शगाव योजनेचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार यांनी केले. प्रसन्ना पोपटराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली  प्रयास ग्रुपच्या वतीने जमा केलेली सुमारे चार लाख रुपये किंमतीच्या वस्तूंची मदत पूरग्रस्तांना वाटप करण्यासाठी ग्रुपचे सदस्य नुकतेच रवाना झाले.

या सदस्यांना मार्गदर्शन करताना पवार बोलत होते. ते पुढे म्हणाले की, या प्रयास ग्रुपच्या युवकांनी पूरग्रस्तांसाठी गोळा केलेली मदत खूप मोठी नाही मात्र ती खूप मोलाची आहे. आज हे युवक राष्ट्र सेवेचे कार्य करीत असून ज्येष्ठांनी त्यांना मार्गदर्शन केले पाहिजे. ज्यातून त्यांना प्रेरणा मिळेल.

आज युवक सामाजिक कार्यापासून दूर चालला असून प्रयास ग्रुपच्या माध्यमातून मात्र हे युवक आपल्या बांधवांवर आलेल्या महापुराच्या संकटाच्या वेळी त्यांच्या मदतीसाठी चालले आहेत. हे इतरांसाठी प्रेरणादायक असल्याचे देखील ते म्हणाले.