file photo

अहमदनगर Live24 टीम, 24 जुलै 2021 :-  सकाळी महामार्गावर सायकलिंगसाठी गेलेल्या नगर शहरातील गर्व्हन्मेंट कॉन्ट्रॅक्टर अश्विन दिलीप गडाख यांचा नगर-औरंगाबाद महामार्गावर वांबोरी फाट्याजवळ एका मालवाहू टेम्पोने दिलेल्या धडकेत मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

अश्विन गडाख हे निर्मलनगर परिसरात रहिवासी होते. त्यांची सरकारी ठेकेदार संस्था होती. या संस्थेमार्फत ते महापालिका, जिल्हा  परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग आदी विभागांचे विविध विकासकामे करत होते.

त्यांना सायकलिंगची आवड होती. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून ते दररोज सकाळी सायकलिंगसाठी जात असत. शुक्रवारी पहाटे नेहमीप्रमाणे ते व त्यांचे मित्र प्रविण गांगड हे नगर-औरंगाबाद महामार्गावर सायकलिंगसाठी गेले.

६ वाजण्याच्या सुमारास वांबोरी फाट्याजवळ पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या मालवाहू टेम्पोने त्यांना जोराची धडक दिली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर टेम्पो चालक टेम्पो तेथेच सोडून पसार झाला.

याबाबत एमआयडीसी पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनीही घटनास्थळी येऊन अपघातग्रस्त मालवाहू टेम्पो ताब्यात घेतला. नगर शहरात ही अपघाताची माहिती समजताच मयत गडाख यांच्या मित्रपरिवाराने त्यांच्या निर्मलनगर येथील घराकडे धाव घेतली.

नेवासा तालुक्यातील पानसवाडी या त्यांच्या मूळगावी गडाख यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत गडाख यांच्या पश्चात आई-वडिल, पत्नी, १मुलगा व भाऊ असा परिवार आहे. त्यांना शहर परिसरात मोठा मित्र परिवार होता.