अहमदनगर Live24 टीम, 6 ऑगस्ट 2021 :- श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर खुर्द येथील शेतकरी सुदाम नारायण शिंदे यांच्या चार दुभत्या शेळ्यांवर हल्ला करून ठार करण्याची दुर्दैवी घटना बुधवारी (दि. ०४) मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास घडली.

शिंदे यांनी आपल्या राहत्या घराशेजारी हाकेच्या अंतरावर असलेल्या छप्पराच्या घरात शेळ्या बांधल्या होत्या. या हल्ल्यात चारही शेळ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. शिंदे यांचे सुमारे ५५ हजारांचे नुकसान झाले.

ही घटना ताजी असतानाच त्याच दिवशी रात्री साडे अकरा व गुरुवारी (दि. ०५) पहाटे साडे तीन वाजेच्या सुमारास बिबट्याने मी पुन्हा येईल… मी पुन्हा येईल… मी पुन्हा येईल या अविर्भावात शिंदे यांच्या वस्तीवर थाटात एन्ट्री केली.

ज्या छप्पराच्या पावसामुळे जीर्ण झालेल्या भिंतीच्या बोगद्यातून प्रवेश करून बिबट्याने आतमध्ये बांधलेल्या चार दुभत्या शेळ्यांचा फडशा पाडला होता त्याच बोगद्यातून छप्परात घुसला.

बिबट्या आल्याची चाहूल शेजाऱ्यांना लागली. मात्र बाहेर येण्याची कोणाची हिम्मत होईना. छपरात शेळ्या नाही व लोकांनी आरडाओरड केल्याने बिबट्याने छपराच्या कुडावरून धूम ठोकली.

जाता जाता शेजारील खुराड्यात असलेल्या कोंबड्यांवर ताव मारण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. मात्र जाळी मजबूत असल्याने बिबट्याचा हा प्रयत्न फसला. तरुणांनी फटाके वाजवून बिबट्याला पिटाळून लावले.

असे असले तरी बेलापूर खुर्द व केसापूर ग्रामस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात दहशत पसरली आहे.वनविभागाने या भागात लवकरात लवकर पिंजरे लावून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी परिसरातून जोर धरत आहे.