file photo

अहमदनगर Live24 टीम, 24 जुलै 2021 :- जगभरात झोपेवर झालेल्या 153 हून अधिक संशोधनं तपासून पाहिल्यावर असं लक्षात आलं आहे की, झोप पुरेशी न घेतल्यामुळं हृदयरोग, रक्तदाब (ब्लडप्रेशर) आणि मधुमेहाचा (डायबिटीज) धोका निर्माण होऊ शकतो.

एखाद्या सदृढ व्यक्तीनं पुरेशी झोप न घेता काही रात्री जागून काढल्या तर त्या व्यक्तीचं शरीर प्री-डायबेटिक अवस्थेमध्ये जाऊ शकतं.

म्हणजेच पुरेशी झोप न मिळाल्यामुळे शरीराची रक्तातील ग्लुकोज स्तर नियंत्रण करण्याची जी क्षमता आहे ती कमी होते,

असं संशोधक सांगतात. पुरेशी झोप न मिळाल्यामुळं आपली रोगप्रतिकार क्षमता कमी होते आणि लसीकरणाचा प्रभाव कमी होतो.

जर समजा तुम्ही तीन रात्री सात तास किंवा त्यापेक्षा कमी झोप घेतली तर पुरेशी झोप घेतलेल्या लोकांच्या तुलनेत तुम्हाला सर्दी होण्याचा धोका अधिक असतो.

झोप पुरेशी न घेतल्यामुळे वजन वाढू शकतं. त्याचं कारण असं आहे की झोप पुरेशी न झाल्यामुळं शरीरातलं ग्रेलिन नावाच्या हार्मोनचं प्रमाण वाढतं त्यामुळं तुम्हाला भूक लागली आहे असं वाटत राहतं.

तर लेप्टिन नावाच्या हार्मोनचं प्रमाण कमी होतं. लेप्टिनमुळं जेवण झाल्यावर समाधान मिळतं. जर या हार्मोनचं प्रमाण कमी असेल तर तुम्हाला सारखं खावं वाटेल.

झोप आणि मेंदूच्या कार्यात जवळचं नातं आहे हे देखील आता सिद्ध झालं आहे. पुरेशी झोप घेणाऱ्या व्यक्तीला म्हातारपणी स्मृतिभ्रंश होण्याचा धोका कमी असतो असं संशोधक म्हणतात.