अहमदनगर – एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे खासगी वाहतुकीला सुगीचे दिवस आले आहे. प्रवाश्याना प्रवासासाठी पर्याय उपलब्ध नसल्याने खासगी वाहनचालक याचाच फायदा घेताना दिसून येत आहे.

नेवासा तालुक्यातील शनीशिंगणापुरात भाविकांची गर्दी वाढली तसे कमिशन एजंटांचे (लटकू) प्रमाण दुपटीने वाढले आहे.

मागील पंधरवड्यात सोनईत झालेल्या शांतता कमेटी बैठकीत पोलीस उपअधीक्षक सुदर्शन मुंडे यांनी सोनई व शनिशिंगणापूर पोलिसांना लटकूंचा बंदोबस्त करा, असा आदेश जाहीर भाषणात दिला होता.

या आदेशानंतर लटकू कमी होण्याऐवजी त्यात दुपटीने वाढ झाली. सक्ती व अडवणुकीची साडेसाती शनिभक्तांना सहन करावी लागत आहे.पोलीस अर्थपूर्ण दुर्लक्ष करत असल्याने नाराजीचा सूर वाढत आहे.

राहुरी ते शिंगणापूर व घोडेगाव ते शिंगणापूर मार्गावर मोटारसायकल वरील लटकू मोठ्या प्रमाणात वाढले असून ते भरधाव वेगात वाहनांचा पाठलाग करतात. लटकूंच्या चुकीने यापुर्वी अनेकांना जीव गमवावा लागला तर अनेकांना अपंगत्व आले आहे.

प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली असून एसटी संपानंतर अव्वाचे सव्वा भाडे घेत नियमबाह्य वाहतुक होत असताना आठ दिवसात एकही कारवाई झाली नाही.

दिवाळी सुट्टीची प्रचंड गर्दी असताना शिंगणापूर पोलिसांच्या लटकू बंद मोहिमेचा पुरता फज्जा उडाला आहे. म्हणूनच जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस प्रमुखांनी याबाबत लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे.