file photo

अहमदनगर Live24 टीम, 4 ऑगस्ट 2021 :- एकीकडे पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण विभागात वरुणराजा धो-धो बरसत असताना विदर्भात सर्वसाधारण पाऊस झाला असल्याने अनेक जलाशये अजून भरलेली नाहीत.

अशा परिस्थितीत ऑगस्ट महिन्यात सामान्य पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. आज पुण्यासह सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग आणि नाशिक या सात जिल्ह्यांना हवामान खात्यानं येलो अलर्ट जारी केला आहे.

याठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. तर उद्या पुणे, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. दरम्यान जुलै महिन्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात कोकणासह पश्चिम महाराष्ट्राला झोडपल्यानंतर राज्यात पावसाने सध्या उघडीप दिली आहे.

पण उत्तर भारतात मात्र पावसाने जोर वाढला आहे. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, हिमाचल प्रदेश या राज्यांत अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. यावर्षी जूनपासून राज्यात कोसळलेल्या हंगामी पावसाचा विचार केला असता, राज्यात समाधानकारक पाऊस कोसळला आहे.

धुळे, नंदुरबार आणि जळगाव या तीन जिल्ह्यांत मात्र सरासरी पेक्षा कमी पाऊस झाला आहे. पण गेल्या आठवड्यात पावसानं पुन्हा जोर पडकल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे. शिवाय ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यात राज्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.