file photo

अहमदनगर Live24 टीम, 1 ऑगस्ट 2021 :- महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण विभागाने राज्यातील कोरोनामुक्त भागातील इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग १५ जुलै २०२१ पासून सुरु करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार गेल्या 15 दिवसांत जिल्ह्यातील 1 हजार 242 पैकी 194 शाळा सुरू झाल्या असून त्यात 16 हजार 80 विद्यार्थ्यांची उपस्थिती आहे.

करोनामुक्त गावांमध्ये आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याच्या निर्णयानंतर नगर जिल्ह्यात दिवसेंदिवस शाळा संख्या वाढत आहेत. जिल्ह्यात 194 शाळा सुरू झाल्या असून सुरू झालेल्या शाळांची संख्या पाहता उत्तर जिल्ह्यातील 137 शाळा तर दक्षिणेतील अवघ्या 57 शाळांचा समावेश यात आहे.

करोनाची स्थिती काहीशी आटोक्यात आल्यानंतर महिनाभरापूर्वी करोनामुक्त गावांमध्ये शासनाने आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यास मान्यता दिली.जिल्ह्यात 15 जुलै रोजी शाळा सुरू झाल्या. दुसर्‍या दिवशी 16 जुलैला 149 शाळा सुरू झाल्या.

आता 30 जुलैअखेर जिल्ह्यात 194 शाळा सुरू झाल्या असून त्यात 16 हजार 80 विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. करोनामुक्त गावांत शाळा सुरू करताना पालकांची संमतीपत्रे आवश्यक आहेत. तसेच शाळा सुरू करताना शिक्षकांनी करोना चाचणी करणे अनिवार्य केले होते.

पालकांनी परवानगी दिली तरच अशा शाळा सुरू होऊ शकतात. आतापर्यंत 194 शाळा सुरू झाल्या असून इतर गावांतील शाळा कधी सुरू होणार? त्यांना कधी परवानगी मिळणार याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.